पुणे, पिंपरी – चिंचवड, शहर झपाट्याने विकसित होत आहे. यामध्ये आयटी, ऑटो आणि आर्मी तसेच इतर नोकरदार लोक मोठ्या संख्येने राहतात जे आलिशान, सर्व सुविधायुक्त, योग्य किंमत, चांगले लोकेशन आणि आलिशान अपार्टमेंट शोधत असतात.
आपल्या स्वप्नातील लग्जरियस घर आणि ज्याच्या आसपास शाळा, कॉलेज, मॉल आणि दैनंदिन गरजांचे साधन हाकेच्या अंतरावर असतात तेथील किमतीही आता आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे घर खरेदीदारांनी काही गोष्टी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक बनले आहे.
हिंजवडी, बाणेर, बालेवाडी आणि रावेत जवळील आयटी क्षेत्रात काम करणारे, वर्क फ्रॉम होम काम करणारे घर खरेदीला पसंती देतात. मात्र, बिल्डरकडून वेळेवर घराचा ताबा मिळाला नाही तर नुकसान होते. बरेच लोक घरे बुक करतात आणि वर्षानुवर्षे ईएमआय भरतात, सोबत घरभाडे भरण्याच्या बोजा सोसावा लागतो.
कारण, एकीकडे त्यांना त्यांच्या घराचा ईएमआय भरावा लागतो, तर दुसरीकडे ते राहत असलेल्या घराचे भाडेही भरावे लागते. यासाठी रेडी टू होमला आयटीयन्स पसंती देतात.
मात्र, सर्वसामान्य नागरिक बजेटमध्ये घर असावे यासाठी शहरापासून दूरवर घर घेण्याला पसंती देत आहेत. कोणत्याही प्रकल्पातून घर खरेदी करताना घराचा (फ्लॅट असो वा बंगला) कार्पेट एरिया आणि सुपर एरिया यांच्याबाबत खुलासा करून घेणे आवश्यक असते.
रियल इस्टेट एजन्सी किवा एजंटकडून ही खरेदी होणार असेल तर नेहमी सुपर एरिया धरूनच किंमत ठरविलेली असते. सुपर एरियामध्ये जिन्यातील जागा, घराबाहेरचा कॉमन पॅसेज, लिफ्ट, घराच्या बाहेरच्या भिंतीपासून एरिया मोजणे असे प्रकार असतात. मात्र, किंमत आकारताना या सर्व एरियासाठीची आकारली जाते.
सॅपल फ्लॅट पाहून घर खरेदीचा निर्णय घेताय ?
दुसरा प्रकार असतो तो सँपल फ्लॅट रेडी म्हणून जाहिरात करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचा. ग्राहकाला आकर्षून घेणे हे त्यातले मुख्य उद्दिष्ट्य असते. यात महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट अशी की, सँपल फ्लॅट पाहून आपण घर खरेदी करायचा निर्णय घेऊ नये. कारण, दाखविण्याचे दात आणि खायचे दात वेगळे असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
या सँपल फ्लॅटचे सिलिंग प्रत्यक्षातील फ्लॅटपेक्षा उंच असते. तेथे साठवणाची जागा अधिक दाखविलेली असते. महागड्या टाईल्स, महागडी बाथरूम फिटिंग्ज, मॉड्युलर किचन यामुळे ते अधिक आकर्षकही बनविले जाते. प्रत्यक्षात घर घेताना या सोयींसह ते मिळत नसते तर या सोयी हव्या असतील तर त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत असतात. अशा प्रकल्पातून घर घेताना या गोष्टींचा खुलासा जसा करून घ्यायला हवा.
परवानग्या मागण्याचा ग्राहकाला अधिकार..
बांधकाम सुरू होण्याअगोदर शक्यतो बुकिंग करू नये. करायचे असेलच तर बिल्डरकडे आवश्यक त्या सर्व परवानग्या आहेत का याची खातरजमा करायला हवी. जागा वापर परवाना, ना हरकत प्रमाणपत्र, इलेक्ट्रिक, वॉटर बोडांच्या परवानग्या, स्थानिक नोंदण्या, काही विशिष्ठ भागात लष्करी परवानग्याही आवश्यक असतात. या सर्व परवानग्या पाहण्यासाठी मागण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. आपण त्यांची खातरजमा आपल्या विश्वासाच्या वकिलांकडूनही करून घ्यावी. ऊंच इमारतींसाठी विशेष परवानग्या आवश्यक असतात, हे लक्षात ठेवावे.