मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्प टप्पा -1 वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारित मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या नवीन विस्तारित एलिव्हेटेड मेट्रो मार्गांना मंजुरी देण्यात आली. आता केंद्र सरकारच्या परवानगीनंतर या विस्तारित मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार आहे..
16 किलोमीटर लांबीचा वनाज – रामवाडी मेट्रो मार्ग आता कार्यान्वित झाला आहे. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्च रोजी करण्यात आले. आता या मार्गावर विस्तारित मेट्रो मार्गांना परवानगी देण्यात आली आहे. त्यावर 3 हजार 756 कोटी 58 लाख रुपये खर्च होणार आहेत.
हा निधी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्याने हा प्रकल्प आता केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळासमोर (PIB) सादर केला जाणार आहे. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प रेल्वे विभागामार्फत अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत पोहोचेल. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
– वनाज ते चांदणी चौक – अंतर 1.12 किमी – 2 स्थानके असतील.
– रामवाडी ते वाघोली – अंतर 11.63 – किलोमीटर – 11 स्थानके असतील.
शहराचा औद्योगिक विकास आणि विस्तारही वेगाने होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन विस्तारित मेट्रो मार्ग उपनगरांना शहराशी जोडतील..
– उपमुख्यमंत्री अजित पवार