पुणे – मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! प्रगती एक्सप्रेससह ‘या’ गाड्या सहा दिवस रद्द, पाहा नवे वेळापत्रक..
पुणे ते मुंबईदरम्यान धावणारी डेक्कन क्वीन दोन दिवस, तर प्रगती सहा दिवस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 17 मेपासून काही गाड्या सीएसएमटी स्थानकाऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत. त्यामुळे पुणे – मुंबई प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनवरील (सीएसएमटी) फलाट क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मध्य रेल्वेकडुन सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरणाचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. या कामाचा शेवटचा टप्पा सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकावर काही गाड्या 17 ते 27 मेदरम्यान येणार नाही. त्यामुळे या गाड्या दादर स्थानकापर्यंत धावतील.
तसेच परतीचा प्रवास दादर येथूनच करावा लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यामध्ये पुणे – मुंबई धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसचा समावेश आहे. यामध्ये 28 मे ते 2 जूनदरम्यान सर्वाधिक गाड्यांना फटका बसणार असून, त्यामध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती या गाड्यांचा समावेश आहे.
मुंबईतील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या प्रभावित होणार आहेत. पुण्याहून मुंबईला प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे ते मुंबईदरम्यानच्या काही गाड्या देखील रद्द असणार आहेत. पण पुणे विभाग आम्हाला याची माहितीच नसल्याचे सांगत आहे.
अगोदरच रद्द गाड्यांची माहिती दिल्यास प्रवाशांना काही तरी नियोजन करता येईल. परंतू पुणे विभागाच्या उदासीनतेचा फटका प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. पुणे जनसंपर्क विभागाकडून गाड्या रद्द असल्याची माहिती नसल्याचे सांगितले.
रद्द केलेल्या गाड्या ..
पुणे – मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस – (28 मे ते 2 जून)
पुणे – मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (31 ते 2 जून)
पुणे – मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेस (1 व 2 जून)
पुणे – मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (1 व 2 जून)
कुर्ला – मडगाव – कुर्ला ( 1 व 2 जून)
दादरपर्यंत धावणाऱ्या गाड्या ..
मुंबई – चेन्नई एक्स्प्रेस
हैदराबाद – मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस
भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्स्प्रेस
साईनगर शिर्डी – मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
होस्पेट – मुंबई- होस्पेट एक्स्प्रेस