महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंग रोड) भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानुसार पश्चिम मार्गावरील 32 गावांमधील 631 हेक्टर (1560 एकर जागेपैकी 343 हेक्टर (850 एकर) म्हणजे 65 टक्के जागा ताब्यात आली आहे.
येत्या जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित 710 हेक्टर जागेचा ताबा घेऊन संपूर्ण 1560 एकर जागेचा ताबा एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारतर्फे जिल्हा प्रशासनाला भूसंपादनासाठी 1700 कोटी रुपये देण्यात आले असून 1500 कोटी रुपये वाटण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडे 200 कोटी रुपये शिल्लक असून नव्याने 1 हजार कोटींची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीकडून प्रकल्प हाती घेतला आहे. पश्चिम आणि पूर्व अशा दोन टप्प्यांत प्रकल्प करण्यात येणार असून, पश्चिम मार्गावरील जमिनीचे 65 टक्के भूसंपादन झाल आहे, तर पूर्व मार्गावर असणाऱ्या गावांमधील स्थानिकांना नोटीस देऊन भूसंपादनाची कार्यवाहीदेखील वेगाने सुरू करण्यात आली आहे.
पश्चिम मार्गावरील रिंगरोडची रचना बदलल्याने तीन गावांची भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित राहिली होती. त्याबाबतही कार्यवाही करण्यात आली आहे. रिंगरोडसाठी पश्चिम मार्गावरील सुमारे 631 हेक्टरचे निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी संमतीने 260 हेक्टर, तर सक्तीने 370 हेक्टर क्षेत्राचे सक्तीने निवाडे जाहीर करून भूसंपादन करण्यात आले आहे. पूर्वेकडील 46 गावांमधील बाधितांना भूसंपादनाच्या नोटीस देण्यात आल्या असून, मुदतीनुसार तातडीने पुढील कार्यवाही करण्यात आला असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले..
पुणे रिंगरोड प्रकल्पाच्या वेस्टर्न अलाइनमेंटसाठी महाराष्ट्र सरकार संपादित करत असलेल्या जमिनीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने भरपाईचे दर निश्चित केले असून प्रतिहेक्टरी 3.7 कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे.
बांधकामाला कधी होणार सुरुवात..
पुण्याचा 172 किमी लांबीचा रिंगरोड प्रकल्प मार्च – एप्रिल 2024 मध्ये सुरू होणार आहे, ज्याचा उद्देश कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि वाहतूक कोंडी कमी करणे आहे. भूसंपादन पूर्णत्वाकडे आहे आणि जानेवारी 2024 पर्यंत अंतिम रूप दिले जाईल आणि हा प्रकल्प पुणे – बेंगळुरू, पुणे – नाशिक, पुणे – मुंबई, पुणे – सोलापूर, पुणे – अहमदनगर आणि पुणे – सासवड – पालखी मार्ग या प्रमुख महामार्गांना जोडेल. अखंडपणे बांधकाम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा असताना, शहर हा महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्प पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे..
टप्पा 1 : थेऊरफाटा – NH 65 – केसनांद – वाघोली – चर्होली – भावडी – तुळापूर – आळंदी – केळगाव – चिंबळी
टप्पा 2 : NH 60 – चिंबळी मोई – निघोजे – सांगुर्डे – शेलारवाडी – चांदखेड – पाचणे – पिंपोली – रिहे – घोटावडे – पिरंगुटफाटा
टप्पा 3 : पिरंगुटफाटा – भूगाव – चांदणी चौक – आंबेगाव – कात्रज
टप्पा 4 : आंबेगाव – कात्रज – मांगडेवाडी – वडाचीवाडी – होळकरवाडी – वडकीनाका – रामदरा – थेऊरफाटा – NH 65