मुंबई ते नागपूर जोडण्यासाठी महाराष्ट्रात बांधण्यात येणारा 706 किलोमीटर लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. त्याचे बांधकाम 3 सप्टेंबर 2017 पासून सुरू झालं, जे आणखी वर्षभर चालणार आहे. 2 सप्टेंबर 2022 रोजी ते वाहतुकीसाठी खुला केला जाईल असा अभियंत्यांनी दावा केला असला तरी अजूनही शिर्डी ते मुंबई या अंतराचे काम आद्यपही बाकी आहे.
परंतु आता प्रवाशांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आलं आहे. समृद्धी महामार्ग लवकरच लोकांसाठी खुला होणार आहे. महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबरला पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उदघाटन होणार असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या सोहळ्यात कसलीच कसर राहणार नाही याची लगबग सुरू झाली आहे.
एकूण 701 किमी मार्गापैकी शिर्डी ते नागपूर हा 520 किमी पर्यंत पहिला टप्पा असून हे अंतर फक्त 5 तासांत पूर्ण होणार आहे, तर दुसरा टप्पा 210 नाशिक ते मुंबई हे अंतर 3 तासांवरून केवळ दीड तासांवर येणार आहे.
आता महामार्गावरील टोल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी हे 520 किमी अंतर फक्त 5 तासांत पार करण्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 1.73 रुपये म्हणजे जवळपास वाहनचालक व प्रवाशांना 900 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. जितका प्रवास तितका टोल या तत्त्वावर टोलवसुली करण्यात येणार आहे. त्यानुसार 520 किमीच्या मार्गात 19 टोल नाके कार्यान्वित करण्यात आले असून हे टोलनाके 19 एक्झिट पॉइंटवर आहेत.
हा महामार्गाचा फायदा 24 जिल्ह्यांना होणार असल्याचे अभियंते सांगतात. हे 16 टप्प्यांत बांधले जात आहे. सध्या त्याच्या 14 व्या टप्प्याचे काम सुरू आहे. महामार्गावर 7.8 किमी लांबीचा बोगदाही बांधला जात आहे, जो नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्याला जोडला जाणार आहे. यात दोन बोगदे आहेत, ज्यामध्ये येण्यासाठी चार लेन आणि जाण्यासाठी 4 लेन असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था देखील केली जात आहे.
या महामार्गासाठी वाहन वेगमर्यादा 120 कि.मी आहे. 10 जिल्ह्यांमधील 390 गावांना जोडणारा राज्यातील सर्वात मोठ्या या महामार्गाला 55 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.