समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रकल्प मनाला जातो तसेच या महामार्गाची अगदी घोषणा झाल्यापासून चर्चांना उधाण आले होते. आता मात्र लवकरच या सर्व चर्चा संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहे कारण, महाराष्ट्र राज्याचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लवकरच लोकांसाठी खुला होणार आहे.
राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उदघाटन होणार असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या सोहळ्यात कसलीच कसर राहणार नाही याची लगबग सुरू झाली आहे.
यावेळी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हे अंतर 520 किमी असणार आहे. हा मार्ग 11 डिसेंबरपासून प्रवाश्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासांत कापता येणार आहे, त्यामुळे प्रवाशांनाही खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
नागपूर मुंबईदरम्यानचा प्रवास वेगाने व्हावा आणि प्रामुख्याने मराठवाड्यातील मागास भागातील जिल्ह्यांतील रस्त्यांची जोडणी मुख्य महामार्गाला व्हावी, या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 रोजी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती.
तब्बल सात वर्षांनंतर या प्रकल्पाचा पहिला टप्पा प्रवाश्यांसाठी खुला होणार असल्याने नागरिकांमध्ये औत्सुक्याचे वातावरण आहे. प्रकल्पासाठी 55 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
एकूण 701 किमी मार्गापैकी शिर्डी ते नागपूर हा 520 किमी पर्यंत पहिला टप्पा असेल, तर इगतपुरी ते नागपूर हा 623 किमी पर्यंत दुसरा टप्पा आणि महामार्ग वाहतुकीच्या कक्षेतील अतिरिक्त 103 किमी चा रस्ता असेल, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये मध्ये संपूर्ण 701 किमी म्हणजेच मुंबई, ठाणे ते नागपूर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
या महामार्गाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी एकूण 16 पॅकेजमध्ये या महामार्गाचे काम विभागण्यात आले होते. पैकी वर्धा येथील पॅकेज 2 आणि इगतपुरी येथील पॅकेज 14 हे दोन पॅकेज विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले होते.
समृद्धी महामार्ग नागपुर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. हे जिल्हे पुढिल प्रमाणे – नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई ! या 12 जिल्ह्यांव्यतिरिक्त इतरही 12 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.
तर या महामार्गाजवळ असलेल्या चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड या जिल्ह्यांनाही जलद वाहतूकीचा फायदा होणार आहे. सोबतच यात पाच महसुल विभाग येतात. जवळपास 26 तालुके व 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.