शासनाकडून पदभरतीला ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे. पवित्र पोर्टल सुरू न झाल्यामुळे भरतीप्रक्रिया थांबली आहे. आता पदभरतीचा मुहूर्त ठरला असून 15 जानेवारीनंतर पवित्र पोर्टल कार्यान्वित होईल, अशी शक्यता आहे. दहा वर्षांपासून सरकारी शाळांमध्ये शिक्षकभरती झाली नाही, तर दुसरीकडे शिक्षक सेवानिवृत्त झाले.
त्यामुळे सरकारी शाळांमध्ये रिक्तपदांची संख्या वाढली. परिणामी, काही शाळांमध्ये विषयशिक्षक नाहीत. एकदोन शिक्षकांना संपूर्ण वर्ग घ्यावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे परिणामी, शिक्षकांसाठी विद्यार्थी – पालकांना आंदोलन करावे लागले.
त्यानंतर सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पदभरती करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यात अडथळे आले टेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास त्रास झाला. अखेर सर्व अडथळे दूर झाले. आता प्रत्यक्ष भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. 15 जानवारानंतर भरतीप्रक्रिया सुरू होईल. याबाबतच्या सूचना शासनाकडून विभागाला मिळाल्याची माहिती आहे.
नागपूर जि.प.मध्ये होणार 501 जागांची भरती..
प्रथम रिक्तपदांची 80 टक्के पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर ती 70 टक्क्यांवर आणली. बिंदुनामावली व भरती पदांची माहिती शिक्षण आयुक्तालयाकडे पाठविण्यात आली. काही जिल्हा परिषदांची माहिती येणे बाकी आहे. एकदोन दिवसांत सर्व जिल्हा परिषदांची माहिती शासनाकडे येणार आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल. नागपूर जिल्हा परिषदेत 501 शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती आहे.