Shirdi : साई भक्तांसाठी खुशखबर ! शिर्डीला समृद्धी महामार्ग, वंदे भारतनंतर आणखी एक मोठी भेट, आता विमानतळावर..
साईबाबांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. शिर्डीला जाण्यासाठी समृद्धी महामार्ग आणि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळाल्यानंतर आता साईभक्तांना आणखी एक मोठी भेट मिळाली आहे. आता शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच आता शिर्डी विमानतळावरून रात्रीही विमाने टेक -ऑफ आणि लँडिंग करणार आहे.
DGCA कडून आज (गुरुवार, 16 फेब्रुवारी) सकाळी परवानगी मिळाली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आभार मानले आहेत.
नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्न करत होते. आता त्यांना यश मिळालं आहे. कोल्हापूरनंतर आता शिर्डीतही नाईट लँडिंग आणि टेक ऑफ सुरू होत आहे.
साईबाबांच्या भक्तांना गेल्या 2 महिन्यात तिसरी मोठी भेट !
शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांसाठी गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी मोठी आनंदाची बातमी आहे. सर्वप्रथम, रस्त्यांचा संपर्क वाढला आणि समृद्धी महामार्गचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यानंतर रेल्वे मार्गाची सुविधा वाढवून वंदे भारत एक्स्प्रेस गाडी मुंबई ते शिर्डी सुरू झाली. त्याची सुरुवातही पंतप्रधान मोदींनी हिरवी झेंडी दाखवून केली. आता हवाई संपर्काचा विस्तार झाला असून शिर्डी विमानतळावरून रात्रीचे टेक ऑफ आणि लँडिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे.
विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा झाली सुरु..
या नाईट लँडिंगच्या सुविधेमुळे साईभक्तांना आता रात्रीचा प्रवास करून पहाटे काकड आरतीला उपस्थित राहता येणार आहे. म्हणजेच आता रस्ता, रेल्वे आणि हवाई या तिन्ही मार्गांनी साई भक्तांना बाबांच्या दर्शनाची सोय झाली आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे विनंती केली होती. त्यांचे आवाहन लक्षात घेऊन आज सकाळी DGCA ने नाईट लँडिंग आणि टेक ऑफ सुविधा सुरू करण्यास परवानगी दिली.
DGCA ची परवानगी मिळाल्यानंतर आता मार्च – एप्रिलमध्ये रात्रीची विमानसेवा सुरू होणार आहे. शिर्डीसाठी सध्या 13 विमान कंपन्या कार्यरत आहेत. या सुरुवातीमुळे साईभक्तांनाच मोठा दिलासा मिळणार नाही, तर आजूबाजूच्या परिसराच्या विकासालाही नवा आयाम मिळणार आहे.