पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे, मात्र शहराचा विकास होत असताना येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. संपूर्ण जगात ‘ट्रॅफिक जॅम’च्या बाबतीत पुणे सहाव्या क्रमांकावर असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी राज्य सरकार फ्लायओव्हर, नवे महामार्ग, करत विविध उपाययोजना करत आहे.
अशातच आता महाराष्ट्रातील रस्ते कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा करणाऱ्या महत्त्वपूर्ण विकासामध्ये, राज्य सरकार अहमदनगर – पुणे – चाकण महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिरूर – खेड – कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) प्रस्तावित केला असून या प्रस्तावित महामार्गामुळे मराठवाडा येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरुर – खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
मराठवाडा, विदर्भातील वाहनांना मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या शहरांत जाण्यासाठी शिरूरमार्गे चाकण – शिक्रापूर – तळेगाव यामार्गे जावे लागते. परंतु रांजणगाव – चाकण येथील MIDC मुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यामुळे मराठवाड्यातील वाहनांनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PWD कडून दोन प्रस्तावांचा विचार करण्यात आला होता. त्यामध्ये वाघोली ते शिरूर दरम्यान उड्डाणपुल तर दुसरा प्रस्ताव म्हणजे शिरूर मार्गे थेट कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्याचा.. यामध्ये दुसऱ्या पर्यायाचा विचार करून तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे.
कसा असणार हा महामार्ग..
140 किलोमीटरचा हा प्रस्तावित राज्यमार्ग असून मावळ तालुक्यातून 22 किलोमीटर तर खेड तालुक्यातील 72 किलोमीटर उर्वरीत अंतर शिरूर तालुक्यामधील असे एकंदरीत 140 किलोमीटरचा हा रस्ता करण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे.
सुरुवातीला 10 मीटरने या रस्त्याची रुंदी पूर्ण करण्यात येणार असून, भविष्यातील रस्त्यांची गरज लक्षात घेऊन 45 मीटर रुंदीने रस्त्यासाठी भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादन तसेच रस्ते बांधण्यासाठी सुमारे 12 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, शिरुर – पाबळ – राजगुरुनगर (खेड) – शिरवली मार्गे पाईट – वांद्रे – कर्जत असा सुमारे 140 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित केला आहे. कर्जंत मार्ग पुढे पनवेल – उरणला जोडला जाणार आहे. या नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे.
महामार्ग दोन टप्प्यात बांधला जाईल, पहिल्या टप्प्यात सुमारे 60 किलोमीटरचा चौपदरी महामार्ग आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 80 किलोमीटरच्या बांधकामाचा समावेश असेल. महामार्गामुळे तीन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवास त्रासमुक्त होईल अशी अपेक्षा आहे.
हा महामार्ग प्रकल्प रस्ते कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या आणि अशा प्रकारे या प्रदेशातील व्यापार आणि व्यापाराला चालना देण्यासाठी एका मोठ्या योजनेचा एक भाग आहे, ज्यामुळे शेवटी सर्वांगीण विकास होईल, अशी अशा पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी व्यक्त केली.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी..
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पुणे आणि नाशिकला जोडणाऱ्या महामार्गावरील खेड (राजगुरुनगर) येथे बायपास नुकताच खुला केला आहे. या 4.9 किमीच्या बायपासमुळे दोन जिल्ह्यांमधील प्रवासाचा वेळ किमान 30 मिनिटांनी कमी होईल. यापूर्वी खेड शहरातून जाणाऱ्या अरुंद गाडी मार्गामुळे पुणे – नाशिक दरम्यानच्या 212 किलोमीटर अंतरावरून जाणाऱ्या वाहनांना साडेचार तासांचा अवधी लागत होता.
याशिवाय सिंहगड रस्ता ते कर्वेनगर आणि कोथरूड भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्राधिकरण पुण्यात दोन नवीन पूल बांधणार आहे. सनसिटी ते कर्वेनगर दरम्यानच्या पुलाच्या बांधकामाला आता मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहराला जोडण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका (PCMC) बोपोडी आणि औंध दरम्यान मुळा नदीवर आणखी एक पूल बांधणार आहे.