Repo Rate : रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ..! तुम्हीही घेतलंय का होम, ऑटो, पर्सनल लोन ? पहा, आता इतका वाढणार EMI, असं करा कॅल्क्युलेशन..
देशातील महागाई दर कमी होत असला तरी सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढत आहे. बुधवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात 25 बेस पॉइंट्स म्हणजे 0.25 टक्क्यांनी वाढ करून त्यांना आणखी एक धक्का दिला आहे. गेल्या वर्षी, मे 2022 पासून आतापर्यंत, रेपो दर सलग सहा वेळा वाढला आहे आणि या कालावधीत तो एकूण 2.50 ने वाढला आहे.
सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीमुळे सर्व प्रकारची गृह, वाहन, वैयक्तिक कर्जे महाग झाली आहेत त्यामुळे लोकांना आता जास्तईएमआय भरावा लागणार आहे. आता 6 व्यांदा वाढ झाल्यानंतर EMI चे कॅल्क्युलेशन जाणून घेऊया..
मे 2022 नंतर रेपो दर असाच वाढत राहिला..
6 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या आरबीआय एमपीसी बैठकीचे निकाल बुधवारी, ८ फेब्रुवारी रोजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केले. त्यांनी सांगितले की, बैठकीत उपस्थित असलेल्या 6 सदस्यांपैकी चार सदस्यांनी रेपो दरात वाढ करण्याचे समर्थन केलं आहे. कोरोनाच्या काळात रेपो दर 4 टक्क्यांवर स्थिर होता, परंतु त्यानंतर, देशातील महागाईचा उच्च स्तर नियंत्रित करण्यासाठी, मे 2022 पासून आत्तापर्यंत आरबीआयने रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ करण्याची घोषणा केली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात त्यात .40%, जूनमध्ये .50%, ऑगस्टमध्ये .50%, सप्टेंबरमध्ये .50% आणि डिसेंबरमध्ये .35% ने वाढ झाली होती. तर आता 2023 च्या पहिल्या MPC बैठकीनंतर, रेपो दरात पुन्हा एकदा .25% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
30 लाखांचं कर्ज घेतलं असेल तर इतका वाढणार कर्जाचा बोजा..
आता रेपो दरात वाढ झाल्यानंतर कर्जदारावर वाढलेल्या बोजाबद्दल जाणून घेउया..
उदाहरण..
समजा एखाद्या व्यक्तीने मे 2022 मध्ये रेपो दरात पहिली वाढ होण्यापूर्वी 20 वर्षांच्या कालावधीसाठी 6.7% व्याजदराने 30 लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. या दराने, त्याला दरमहा 22,722 रुपये EMI भरावा लागत होता.
दुसरीकडे, RBI ने सलग सहा वेळा रेपो रेट 2.50 टक्क्यांनी वाढवल्यानंतर, जर त्या कर्जाचा दर 9.2 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर त्यानुसार EMI प्रति महिना 27,379 रुपया पर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत त्याला दरमहा 4,657 रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत.
ऑटो लोन EMI कॅल्क्युलेशन :-
जर आपण गृहकर्ज तसेच वाहन कर्जाबद्दल पाहिल्यास, आपण असं गृहीत धरू की, आपण 10 लाख रुपयांची कार खरेदी केली आहे आणि त्यावर 5 वर्षांसाठी 8 लाख रुपयांचे कर्ज घेतलं आहे. रेपो दरात वाढ होण्यापूर्वी तुम्ही हे वाहन कर्ज 6% दराने घेतलं होते. त्यानुसार, तुम्हाला दरमहा 15,466 रुपये EMI म्हणून भरावे लागत होते.
आता जर कर्जाचा व्याजदर 8.50 पर्यंत वाढला आहे, तर तुमचा EMI देखील 16,413 रुपये झाला असेल. म्हणजेच तुमच्यावर दरमहा 947 रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढणार आहे.
रेपो रेट वाढल्यामुळे EMI मध्ये होते वाढ…
आरबीआयने निश्चित केलेल्या रेपो दराचा थेट बँक कर्जावर परिणाम होतो. जेव्हा ते कमी होते, तेव्हा कर्ज स्वस्त होते आणि ते वाढल्यानंतर, बँका देखील त्यांचे कर्ज महाग करतात. त्याचा परिणाम होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोन अशा सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो.
येथे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, रेपो रेट हा दर आहे ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो रेट हा दर आहे ज्यावर आरबीआय पैसे ठेवण्यासाठी बँकांना व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा EMI कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतात आणि या क्रमाने EMI मध्येही वाढ होते.