Take a fresh look at your lifestyle.

गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर गाठा फक्त 40 मिनिटात..! वॉटर टॅक्सी सेवा झाली सुरु, पहा तिकीट दर अन् टाइम टेबल..

0

नवी मुंबई बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, नवी मुंबई मनपा उपायुक्त मिताली संचेती, सोहिल खजानी, कॅप्टन रोहित सिन्हा आदी उपस्थित होते.

बेलापूर जेट्टी येथून मंगळवारपासून वॉटर टॅक्सी प्रवासी सेवेला सुरुवात झाली. नवी मुंबई या आधुनिक शहरात महत्त्वाकांक्षी वॉटर टॅक्सी प्रवासी वाहतुकीचा शुभारंभ होत आहे, याचा आपणास आनंद होत असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

या कामात मुंबई पोर्ट ट्रस्ट व केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभारही दादा भुसे यांनी मानले. नवी मुंबईत मंदा म्हात्रे यांचे लढाऊ संघर्षशील नेतृत्व आहे. त्यांनी शहराचा जलदगतीने विकास व्हावा, केंद्राचा मरिना प्रकल्प मार्गी लागावा यासाठी केलेल्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी निश्चितच करू, अशी ग्वाहीही दादा भुसे यांनी यावेळी दिली.

त्याचप्रमाणे वॉटर टॅक्सीचे दर कमी कसे करता येतील, याकडे लक्ष देऊन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प यशस्वी करणार असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. या जलमार्गामुळे दीड तासाचा प्रवास 40 ते 50 मिनिटांवर येणार आहे. भविष्यात प्रवासी संख्या वाढल्यावर फेऱ्या वाढतील . पर्यायाने भाडे आकारणी कमी होईल, असा आशावाद मंत्री भुसे यांनी व्यक्त केला.

आ. मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली खंत

नवी मुंबईत आपण सर्वोत्तम आठ जेट्टींची निर्मिती केली, मात्र बेलापूर येथील जेट्टीविषयी आमदार मंदा म्हात्रे यांनी आपली खंत व्यक्त केली. या जेट्टीच्या कामाचे नियोजन खराब आहे. येथे कॅटीन, शौचालय तसेच अन्य सुविधा नसल्याची खंत व्यक्त करत मंत्री दादा भुसेंसमोर प्रशासनाला खडसावले. तसेच दादा भुसे यांनी यात जातीने लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

अशी आहे सेवा :-

मंगळवार, 8 फेब्रुवारी 2023 पासून गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली. मुंबई पोर्ट अँथोरिटीने नयनतारा शिपिंग कंपनीला प्रवासी सेवा चालवण्यास मान्यता दिली आहे. नयन इलेव्हन या वॉटर टॅक्सीमध्ये खालच्या डेकवर 140 प्रवासी प्रवास करू शकतात. यासाठी 250 रुपयाचे तिकीट असेल.

बिझनेस क्लासमधून 60 प्रवासी प्रवास करू शकतात. त्यासाठी 350 रुपये मोजावे लागतील. ही प्रवासी बोट सकाळी 8.30 वाजता बेलापूर जेट्टीवरून निघेल व 9.30 मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचेल. तर संध्याकाळी 6.30 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून ही वॉटर टॅक्सी निघेल व 7.30 वाजता बेलापूर जेट्टीवर पोहोचेल.

Leave A Reply

Your email address will not be published.