सध्या सोयाबीनचे भाव क्विंटलला साडेचार ते साडेपाच हजारांच्या दरम्यान अडकून पडले आहेत. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच दाबून ठेवले असून असे सर्व शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत. बाजारात खाद्यतेलाचे दर उतरल्यामुळे वाढत असलेले सोयाबीनचे दर अचानक खाली कोसळले आहेत.
त्यातच सध्या बाहेरच्या देशांमध्येही सोयाबीनला फारशी मागणी नाही. सोयाबीनचे दर सुद्धा बऱ्याचअंशी जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतात. जागतिक बाजारपेठेतच सध्या फारसे दर नसल्याने तूर्तास तरी सोयाबीन विकणे शेतकऱ्यांना परवडणार नाही असे चित्र दिसत आहे. हेच चित्र कायम राहणार असे दिसत असल्याने सध्यातरी शेतकऱ्यांना भाववाढीचा प्रतीक्षा करावी लागत आहे.
यंदा सोयाबीनला चांगला दर मिळेल. या अपेक्षेने खर्चाकडे न पाहता शेतकऱ्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. अतिवृष्टीच्या तडाख्यातून देखील पीक वाचविले पण पीक घरात आले अन् सोयाबीनचे भाव पडले. चार – पाच हजारांवर सोयाबीन विकले तर झालेला खर्चही भरून निघणे कठीण आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर कोणताच पर्याय शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे.
यंदा अनेकांनी केली होती लागवड
मागीलवर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला होता हे पाहून यावर्षीही तीच परिस्थिती राहील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनचे पीक घेतले होते. मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनची पेरणी केली होता.
पण सध्यातरी सोयाबीनपेक्षा मका उत्पादक सर्रास ठरले आहेत. मका उत्पादक शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळत आहे. सोयाबीन उत्पदकांना मात्र अजून काही महिने वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही असेच चित्र सध्या दिसत आहे.
बाजारसमिती —- सर्वसाधारण दर..
लासलगाव : 5450
चादवड : 5400
नादगाव : 5336
विंचूर : 5450
पालखेड : 5550
सिल्लोड : 5000
उदगीर : 5560
परभणी : 5400
पैठण : 5165
अहमदनगर : 4675
यामुळे सध्यातरी सोयाबीनचे दर साडेचार ते साडेपाच हजारांच्या दरम्यानच घुटमळत आहेत. सौथ अमेरिकेमधील अर्जेंटिनामध्ये सध्या दुष्काळी स्थिती आहे . यामुळे दर वाढण्याची अपेक्षा टिकून आहे. पण त्यासाठी अजून काही काळ तरी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.