शासनामार्फत विद्यार्थ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात, मात्र बहुतेकवेळा या योजनांबाबत माहितीच शाळा किंवा पालकांना नसते असे दिसून आले आहे. शासनाची अशीच एक योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना. या योजनेच्या माध्यमातून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याला अपघात झाला, शस्त्रक्रिया करावी लागली किंवा अपघाती, आजारपणाने मृत्यू झाला, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून पालकांना ही मदत मिळते याची माहितीच अनेक शाळांना नसल्याचे दिसून आले आहे.

20 ऑगस्ट 2003 पासून विद्यार्थ्यंना नुकसानभरपाई किंवा सुरक्षा कवच देण्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपन्यांमार्फत राबवण्यात येत होती. या योजनेच्या विम्याचे सर्व हप्ते शासन भरत होते; परंतु विमा कंपन्या वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होत्या.

यामुळे नुकसानग्रस्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होता नव्हता. यावर उपाय म्हणून शासनाकडून 11 जुलै 2011 रोजी सानुग्रह अनुदान योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 27 ऑगस्ट 2012 पासून या योजनेची नियमितपणे अंमलबजावणी करण्यात येऊ लागली.

मात्र, या योजनेमध्ये काही त्रुटी होत्या, विद्यार्थ्याचा मृत्यू झाला किंवा एखादा दुसरा अवयव निकामी झाला तरच या योजनेमार्फत अनुदान मिळत होते. मात्र, 21 ऑगस्ट 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार एखादा विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू पावला तरीही त्याला अनुदान मिळणार आहे.

अपघातानंतर शस्त्रक्रिया करावी लागली तर त्यातही अनुदानाचे प्रावधान करण्यात आले आहे. मात्र, या नव्या योजनेबाबत फारशी जागरूकता प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना नसल्याचे समोर आले आहे. यासाठी या योजनेबाबत समाजमाध्यमांतून माहिती देणे गरजेचे आहे.

या योजनेबाबत माध्यमिक, प्राथमिक आणि महापालिकेचे शिक्षणाधिकारी आणि तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अधिकची माहिती मिळू शकते. यासाठी पालक आणि शिक्षकांनी सजग राहिले पाहिजे.

असे मिळते अनुदान :-

या योजनेंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 1 लाख 50 हजार रुपये मिळतात.

विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास 1 लाख 50 हजार रुपये मिळतात.

विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास म्हणजेच क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू अंगावर पडून, आगीमुळे, विजेचा धक्का बसून, वीज अंगावर पडून अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा अधिकाधिक 1 लाख रुपये या योजनेतून मिळू शकतात.

अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास 1 अवयव किंवा 1 डोळा कायमचा निकामी झाल्यास 75 हजार रुपये मिळतात.

तर अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा अधिकाधिक 1 लाख रुपये मिळण्याची व्यवस्था या योजनेतून केली जाते.

कोणाला मिळू शकतं हे अनुदान..

पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांबाबतीत असे प्रकार झाले असतील आणि घटना 21 जून 2022 नंतरची असेल तर तातडीने याबाबत प्रस्ताव केल्यास अश्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

पालक आणि शाळेने याबाबतचे प्रस्ताव तयार करणे गरजेचे असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रस्तावांना अंतिम मान्यता देत असते. यावर जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *