शेती म्हटले की, फळे, फुले आणि भाजीपाल्याची शेती डोळ्यासमोर उभी राहते. मात्र, या शेतीपेक्षाही लॉनची शेती ही वेगळी आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये ही शेती केली जात असून त्यास कार्पोरेट व बांधकाम क्षेत्रातून मोठी मागणी आहे. या शेतीमध्ये पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील मूलखेडमधील जोतिबा बबन तापकीर यांनी प्रगती केली आहे.

पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील मूलखेडमधील जोतिबा बबन तापकीर यांचे शिक्षण एम.कॉम. पर्यंत झाले आहे. जोतिबा सुरुवातीला पुण्यात 2015 मध्ये पीएमपीएमएलमध्ये मेंटनन्स विभागात काम करत होते. मात्र, त्यादरम्यान खासगीकरण झाल्याने त्यांनी तेथील नोकरी सोडून दिली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना त्याचे मित्र प्रमोद मांडेकर यांनी लॉनच्या शेतीबाबत माहिती दिली आणि या लक्ष शेतीकडे केंद्र करण्याचा निश्चय केला.

सुरुवातीला अवघ्या अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये लॉनची शेती सुरू केली त्यानंतर त्यामध्ये वाढ करून सध्या साडेतीन ते चार एकर क्षेत्रात ही शेती आहे. या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे एकवेळच गुंतवणूक करावी लागते आणि कष्टदेखील कमी करावे लागतात. मात्र, लॉनचे मार्केटिंग करताना कसरत करावी लागते.

लॉनचे विविध प्रकार आहेत. यामध्ये तैवान ग्रास (गवत), अमेरिकन, ब्लू, ग्रास जम्पिंग, पास्पोलॉन असे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचे दरही वेगवेगळे आहेत . तसेच उत्पादनाचा कालावधीही वेगवेगळा आहे.

लॉनला गार्डनिंगसाठी आणि बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक मागणी आहे. तैवान ग्रासला सर्वाधिक मागणी असते. तैवान ग्रासचे उत्पादन हे वर्षातून दोन वेळा काढले जाते. तसेच चार महिन्यांतून एकदा निघते. मात्र, मुळशी परिसरात पाऊस जास्त असल्याने सहा महिन्यांतून उत्पादन घेतले जाते. सिलेक्शन आणि पास्पोलॉन हे तीन महिन्यांतून एकदा उत्पादन घेतले जाते. तर, अमेरिकन ग्रासचे दोन ते अडीच महिन्यांत उत्पादन घेतले जाते.

तापकीर यांनी सर्व प्रकारच्या लॉनसाठी वेगवेगळे प्लॉट केले आहेत. ते स्वतः काम करतात. तसेच त्यांनी ऑनलाइन विक्रीवरदेखील भर दिला आहे. गेल्या सात वर्षांपासून वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांनी लॉनची शेती करण्यास सुरुवात सुरुवातीला शेती करताना लॉनला अपेक्षित दर मिळत नव्हते. मात्र, सध्या दुप्पट दर मिळत आहेत.

सद्य : स्थितीत ज्योतिबा तापकीर यांच्याकडे उत्पादित होणारे लॉनदेखील मागणी वाढल्यामुळे कमी पडत आहे. त्यामुळे ते इतर शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहेत.

जवळपास या शेतीतून वर्षाला तब्बल 15 ते 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मुळशी तालुक्यातील मूलखेडपासून हिंजवडी आयटी पार्क अवघ्या चार किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावर आहे. या ठिकाणी जमिनींना सोन्याचे भाव आहेत. मात्र, जमीन न विकता शेती करत आहेत. सद्यःस्थितीत या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या आहेत अथवा बांधकाम केले आहे. मात्र, तापकीर यांनी जमीन न विकण्याचा निर्णय घेत उत्कृष्टपणे शेती करत आहेत.

लॉनच्या शेतीला आगामी काळात चांगले भविष्य असून यामध्ये आणखी वाढ करण्याचा निश्चय तापकीर यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी रियल लोन फार्मर अँड नर्सरी सुरू केली आहे. तापकीर यांना आठ एकर जमीन आहे. त्यापैकी चार एकर क्षेत्रावर तैवान ग्रास, दोन एकर ऊस आहे. इतर क्षेत्रामध्ये भाताची लागवड केली जाते. भाताचे क्षेत्र हे तैवानसाठी अनुकूल नाही. मात्र, यामध्येही आता लॉनच्या लागवडीयोग्य जमीन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

लॉन शेतीसाठी भाऊ, आई आणि पत्नी यांची मोलाची साथ मिळत असल्याचा आवर्जून उल्लेख तापकीर यांनी केला.

लॉनच्या शेतीची संकल्पना ही नवीनच आहे. मात्र, पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांनी काही प्रमाणात बाहेर येऊन अशा प्रकारच्या शेतीचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होऊ शकतो. सुरुवातीला मलाही अशा प्रकारची शेती म्हणजे वेगळेच वाटत होते. मात्र, सध्या या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे

जोतिबा बबन तापकीर, शेतकरी, मूलखेड, ता. मुळशी, पुणे

बळीराजाची यशोगाथा – गणेश वाघमोडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *