दौंड तालुका तसा गुळाच्या गुऱ्हाळासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. मात्र या पारंपारिक उद्योगाला छेद देत येथील ननावरे पिता-पुत्रांनी एक अतिशय वेगळा असा शेतीला पूरक जोडधंदा सुरू केला असून या जोडधंद्यातून चांगला आर्थिक नफा मिळवण्याचा त्यांचा मानस आहे.
शेतीसाठी जोडधंदा म्हणून आजपर्यंत आपण शेळीपालन, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन अश्या अनेक व्यवसायांबद्दल ऐकलं आणि पाहिलंही असेल मात्र खेकडा पालन हा सुद्धा एक अतिशय चांगला जोडधंदा म्हणून उदयास येत आहे आणि त्याचीच सुरुवात या पिता पुत्राच्या जोडगोळीने दौंड तालुक्यात केल्याचे दिसून येते.
आहारातील खेकड्यांचा समावेश अतिशय फायदेशीर असतो खेकड्यातून मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री, फॅटी अॅसिड्स, व्हिटॅमिन यासोबतच उच्च प्रतीच्या प्रथिन्यांचा शरीराला पुरवठा होतो. त्याचबरोबर खेकडे हे वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी ही अतिशय फायदेशीर आहेत. मधुमेह, कॅन्सर, त्वचा विकार, रक्तपेशींची कमतरता, रक्तदाब आणि सांधेदुखी अशा विविध आजारांविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात खेकड्यांचा आहारात समावेश करणे अतिशय उपयुक्त ठरते.
खेकड्यांच्या औषधी गुणांमुळे बाजारात खेकड्यांची मागणी पाहता त्या प्रमाणात होणारा पुरवठा अतिशय नगण्य असा आहे याच गोष्टीचा फायदा घेत अनेक नवीन शेतकरी या उद्योगात उतरत असल्याचे पाहायला मिळते खेकडा पालन करणे तसे पाहता थोडेसे आव्हानात्मक ठरते मात्र या सर्व अडचणीवर मात करत ननावरे पिता पुत्रांनी हा शेतीपूरक व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे.
यासाठी त्यांनी चाळीस फूट रुंद व पन्नास फुट लांब आणि 11 फूट खोल हौद आपल्या शेतात तयार केला आहे त्यामध्ये वाळूचे खडे मोठे दगड चिकन माती आणि बारीक वाळू इ. गोष्टी टाकण्यात आल्या आहेत. या हौदाची रचना अतिशय योग्य पद्धतीने केल्यामुळे खेकड्यांना योग्य असे वातावरण मिळते. या हौदात टप्प्याटप्प्याने सुमारे एक टन वजनाचे खेकडे सोडण्यात आले आहेत. हे सर्व खेकडे खडकवासला, भोर, भिगवण, इंदापूर या धरणांमधून आणण्यात आले आहे. आणि यांची संख्या सुमारे पाच ते सहा हजार एवढी आहे.
या खेकड्यांचा आहार पाहायला गेलं तर टाकाऊ भाजीपाला, शिजवलेला भात, चिकन सेंटर मधील कोंबड्यांचे अवशेष असा असतो. त्यामुळे खेकड्यांच्या आहारावर खर्च अतिशय कमी प्रमाणात होतो. आता दिवाळीनंतर मांसाहार करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होते त्यामुळे या व्यवसायातून भरघोस आर्थिक नफा होण्याची आशा ननावरे पिता-पुत्रांनी व्यक्त केली आहे.