सोयाबीन म्हटलं की, सर्वप्रथम नाव समोर येत ते मराठवाड्याचं त्याला कारणही तसचं आहे म्हणा, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. हेच कारण आहे की, मराठवाड्याला सोयाबीनचे आगार असेही म्हणतात. मात्र, पुणे जिल्ह्यातील परिसरात सहसा आपल्याला सोयाबीनची शेती दिसून येत नाही.
परंतु या समजाला छेद देण्याचं काम केलं आहे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी या गावातील शांताराम सर्जेराव पाचंगे यांनी. पाचंगे यांनी आपल्या शेतात प्रथमच सोयाबीनचे उत्पादन घेतले आहे. आणि शिरूर तालुक्यात काही बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे.
शांताराम सर्जेराव पाचंगे यांची पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील ढोकसांगवीमध्ये एकूण पाच एकर शेती आहेत. ते अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात आहेत, मात्र त्यांनी यंदा प्रथमच एक एकर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली होती. काढणी होऊन जवळपास एक महिना झाला असला तरी, सध्या सोयाबीनला तुलनेने कमी भाव मिळत असल्याने सर्व सोयाबीन थप्पीला पडून आहे.
सोयाबीनला सध्या साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. आणखी काही दिवस थांबल्यास सोयाबीनचे भाव वाढतील, असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी वर्गातून व्यक्त केला जात आहे. पाचंगे यांना प्रतिक्विंटलला 8 हजार रुपये इतका भाव अपेक्षित आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी एक एकर क्षेत्रामध्ये 12 ते 13 क्विंटल इतके उत्पादन घेतल्याने परिसरात ते चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठवाड्याप्रमाणे शिरूमधील इतर भागातही शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेत आहेत. ढोकसांगवी परिसरातील पाच ते सहा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले आहे. ते या प्रयोगात चांगल्या प्रकारे यशस्वी झाले असल्याचे शेतकरी पाचंगे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, यंदा पिकांना चांगला भाव मिळाला तर पुढील वर्षी आणखी सोयाबीनचे उत्पादन घेणार असल्याचे पाचंगे यांनी सांगितले. आता सोयाबीन घेतलेल्या क्षेत्रामध्ये गव्हाची लागवड करणार असल्याचे पाचंगे यांनी सांगितले आहे.
गेल्या काही वर्षांपासून पंचक्रोशीमध्ये पाचंगे हे शेतीमध्ये विविध प्रकारचे अभिनव उपक्रम करणारे प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र अलीकडील काही वर्षांत पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या असल्यामुळे ते बागायती पिकांकडे वळले आहेत. इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, शिरूर या तालुक्यांमध्ये गेल्या काही वर्षांत ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. बदलते अर्थकारण या सर्वास जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.
ज्वारी, बाजरीच्या तुलनेत बागायती पिकांमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते. पाचंगे हे मात्र स्वतः ज्वारीचे उत्पादन घेत आहेत. त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे ते सेंद्रिय पद्धतीने शेती करत असून यामध्ये ते कसल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. तसेच चवळी, मूग, काळा वाल, गवळा वाल, या सर्वच पारंपरिक धान्याचे सेंद्रिय पद्धतीने ते उत्पादन घेत आहेत.
पाचंगे यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. हाच त्यांचा मुख्य व्यवसाय देखील आहे. त्यांनी रांजणगाव एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी भाड्याने राहण्यासाठी खोल्या देखील बांधल्या आहेत. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतानाच आपली पारंपरिक शेती जपण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीनेच पाचंगे यांनी सध्या दोन एकर क्षेत्रात ज्वारीचे उत्पादन घेतले आहे. त्यांचे ज्वारीचे पीक 10 ते 12 फुटांपर्यंत वाढले आहे.
पेरणीसाठी त्यांनी परभणीवरून ‘लकडी’ जातीचे बियाणे आणले होते. यंदा 20 ते 25 क्विंटल ज्वारीचे उत्पादन होईल, असा अंदाज पाचंगे यांनी व्यक्त केला आहे. ते गेल्या काही वर्षांपासून ज्वारीचे पीक घेता आहेत. ज्वारीसह ते बाजरी, गहू यांचेदेखील उत्पादन घेतात. तसेच शेती कामामध्ये त्यांना पत्नीची मोलाची साथ मिळते. त्यांनी एक ते दीड एकर क्षेत्रामध्ये जनावरांसाठी मका, घास, गिनीगोल गवत यांसह अन्य चाऱ्याची लागवड केली आहे. सध्या त्यांच्याकडे दोन म्हशी आणि तीन गाई आहेत.
सेंद्रिय पद्धतीने घेत आहेत उत्पादन :-
शांताराम पाचंगे यांचे वैशिष्ट्य म्हणजे 10 गुंठे क्षेत्रात हिरवी मिरची, कारली, टॉमेटो, वांगी, ढोबळी मिरची, काकडी, कोथिंबीर, मेथी, वाल, भोपळा यांसह अन्य भाज्यांचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतात. भाज्यांवर कोणत्याही प्रकारचे केमिकल फवारले जात नाही. शेणखतापासून इतर सेंद्रिय खतांपासून सर्व भाज्यांचे उत्पादन घेतले जाते.
सोयाबीनची लागवड करताना शिरूर तालुक्यासारख्या भागात हे पीक तग धरेल का, असा प्रश्न पडला होता. मात्र, एक वेगळा प्रयोग म्हणून या पिकाची लागवड केली आणि त्यात यश देखील आले आहे.
सध्या सोयाबीनला भाव कमी आहेत. त्यामुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवले आहे. ज्या वेळी भाववाढ होईल त्या वेळी त्याची विक्री केली जाणार आहे. तसेच, समाधानकारक भाव मिळाल्यास दरवर्षी सोयाबीनची लागवड करू असा विश्वास पाचंगे यांनी व्यक्त केला आहे.
बळीराजाची यशोगाथा – गणेश वाघमोडे