Take a fresh look at your lifestyle.

पुणे : बारामतीच्या युवा शेतकऱ्याची कमाल, फक्त 3 एकर शेतजमिन अन् 22 वर्षे एकच पीक घेऊन वर्षाला करोडोंची उलाढाल..

0

शेतकरी नेहमीच अनेक अडचणींना तोंड देत आला आहे. पण अश्या अनेक अडचणींत सुद्धा अनेक शेतकरी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आला आहे. कमकुवत आर्थिक पाठबळ आणि संसाधनांची कमतरता असून देखील या शेतकऱ्याने अत्यंत संयम दाखवत तरकारी पिकातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.

या शेतकऱ्याच्या मालकीची अवघी साडेतीन एकर जमिन असून त्यावर तरकारीची विविध पिके घेत असतानाच इतर शेतकऱ्यांची जमींन देखील कसायला घेत त्यावर वर्षभर कोथिंबिरीचे उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण करणारे पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मुरूममधील बबलू बाळासाहेब देशमुख यांची ख्याती सर्व जिल्हाभर पसरली आहे.

मुरूममधील बबलू बाळासाहेब देशमुख हे गेल्या सलग 20 ते 22 वर्षांपासून कोथिंबिरीचे उत्पादन घेत आहेत, मुरूम हे पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील एक छोटेसे गाव, मात्र बबलू शेती करत असतानाच इतर शेतकऱ्यांकडून कोथिंबीर घेऊन पुणे, चिपळूणसह इस्लामपूरमधील बाजारात विक्री करत आहेत . तसेच स्वतःच्या शेतीसह इतरांची शेती कसायला घेत त्यातून सुद्धा ते चांगले उत्पन्न घेत आहेत.

पण त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातील बाराही महिने कोथिंबिरीचे उत्पादन घेण्यात त्यांचा असलेला हातखंडा. यामुळेच त्यांच्याकडे कोथिंबिरीची मागणी केल्यास २४ तासांत आवश्यक तेवढा पुरवठा करण्यास ते सक्षम असतात. हा व्यवसाया करताना राजेंद्र सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि साथ लाभल्याचे बबलू देशमुख यांनी सांगितले.

शेतकऱ्यांकडून ते एकरी 12 ते 13 हजार रुपये प्रमाणे शेती कसायला घेतात. विविध शेतकऱ्यांची मिळून जवळपास ७० ते ८० एकर जमीन त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. शेती भाड्याने घेताना त्यांना अनेकवेळा मोठी जोखीम देखील पत्करावी लागते. निसर्गाच्या लहरीपणामुळे बऱ्याचवेळा मोठ्या प्रमाणात नुकसानही सहन करावे लागते. मात्र याचवेळी त्यांचा गेल्या 20 ते 22 वर्षांचा अनुभव कामी येत असल्याचे बबलू देशमुख आवर्जुन सांगतात.

कोथिंबिरीच्या व्यवसायामध्ये अनेकवेळा नुकसान होते. मात्र वर्षातून दोन ते तीनवेळा या व्यवसायात चांगला बाजारभाव सापडत असल्याने नुकसान भरून निघते. एकरी 10 ते 12 हजार गड्ड्यांचे उत्पादन मिळते. कोथिंबिरीचे पीक येण्यास सुमारे 40 दिवसांचा कालावधी लागतो. बाजारभाव मिळाल्यास एकरी 15 ते 40 हजार रुपये उत्पन्न मिळते. देशमुख हे स्वतःच्या शेतीमध्ये कोथिंबीर, मका, मेथी अशी उत्पादने घेतात. सुरुवातीच्या काळात हा व्यवसाय करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले मात्र, सद्य:स्थितीत त्यांचा या व्यवसायात त्यांचा जम बसला आहे.

या व्यवसायाच्या दररोजच्या व्यवस्थापनासाठी जवळपास 20 ते 25 कामगार लागतात. पावसाळ्यात पावसामुळे कोथिंबिरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते . मात्र, पावसातून जे पीक सहीसलामत बाहेर पडते त्याला अत्यंत चांगला बाजारभाव मिळतो.

येणाऱ्या काळात आपल्याला कोथिंबिरीच्या शेतीमध्ये वाढ करता नाही आली तरी चालेल मात्र, गुणवत्ता आणि विश्वासार्हता जपणे हेच आपले मोठे दायित्व असून ते पेलवायचे असल्याचे बबलू देशमुख सांगतात. तसेच, या व्यवसायात पत्नीची आणि संपूर्ण कुटुंबाची आपल्याला मोलाची साथ मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.