टाटा समूह लवकरच आता बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात उतरणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, टाटा समूह देशातील प्रसिद्ध बाटलीबंद पाणी विक्रेते बिस्लेरी विकत घेणार आहे. टाटा समूह बिस्लेरी इंटरनॅशनलला त्याच्या उपकंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) अंतर्गत 7,000 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. या करारांतर्गत, बिस्लेरीचे सध्याचे व्यवस्थापन दोन वर्षांसाठी कंपनीचे कामकाज पाहणार आहे.
बिस्लेरीचा 60% बाजार हिस्सा
बिस्लेरीच्या वेबसाइटनुसार, बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात कंपनीचा 60 टक्के हिस्सा आहे. सध्या, बिस्लेरीकडे 122 हून अधिक कार्यरत संयंत्रे आहेत. तसेच, भारतात वितरणासाठी 5,000 ट्रकसह 4,500 पेक्षा जास्त वितरक नेटवर्क आहे. मिनरल वॉटर व्यतिरिक्त, बिसलेरी इंटरनॅशनल प्रीमियम हिमालयन स्प्रिंग वॉटर देखील विकते. देशात बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
टाटासोबतच्या करारानंतर, टाटा समूह एंट्री-लेव्हल, मिड-सेगमेंट आणि प्रीमियम पॅकेज्ड वॉटर श्रेणींमध्ये असेल. यामुळे टाटा कन्ज्युमरला ग्राहकांना एक मोठी बाजारपेठ सहज मिळेल.
बिस्लेरीने फार्मास्युटिकल कंपनीपासून केली सुरुवात..
आज बाटलीबंद पाणी विकणारी बिस्लेरी ही कंपनी मलेरियाची औषधे विकणारी औषधी कंपनी म्हणून सुरू झाली. त्याचे संस्थापक इटालियन व्यापारी फेलिस बिस्लेरी होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टर रॉसी यांनी बिस्लेरीला पुढे नेण्याची जबाबदारी घेतली. भारतात डॉ. रॉसी यांनी वकील खुशरू संतकू यांच्या सहकार्याने बिस्लेरी सुरू केली.
1969 मध्ये, बिसलेरी वॉटर प्लांट सुरू झाल्यानंतर अवघ्या 4 वर्षांनी रमेश चौहान यांनी बिसलेरी अवघ्या 4 लाख रुपयांना विकत घेतली. तेव्हापासून या कंपनीची मालकी रमेश चौहान यांच्याकडे आहे. रमेश चौहान 82 वर्षांचे झाले आहेत. त्यांची मुलगी जयंतीला या व्यवसायात रस नाही. त्यामुळे त्यांनी आता हा व्यवसाय विकायचा निर्णय घेतला आहे.