Pune : पुणे-अ.नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार दूर, वाघोली ते शिरूर 56Km अंतर, 18 पदरी रस्त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण, पहा डिटेलस..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल अहमदनगरमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) बांधलेल्या तीन किमी लांबीच्या अहमदनगर मधील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे उद्घाटन केले गेले. यावेळी बोलताना त्यांनी अनेक प्रास्तावित कामे आणि त्याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
सुरत-नाशिक-नगर-सोलापूर येथून चेन्नईला जाणाऱ्या नवीन ‘ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे’ची लांबी अहमदनगर जिल्ह्यात 141 किमी आहे. यामुळे अहमदनगर भविष्यात देशाच्या नकाशावर येईल, असे गडकरी म्हणाले.
हा प्रकल्प 80,000 कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात शक्य तेथे लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे काम केले जाणार आहे.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. असेही गडकरी यावेळी म्हणाले.
पण सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येणार नवा वाघोली ते शिरूर हा महामार्ग. लवकरच पुणे-औरंगाबाद महामार्गाचे काम येत्या काळात सुरु करण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर वाघोली ते शिरूर दरम्यानच्या सध्याच्या पुणे-अहमदनगर मार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रामवाडी-वाघोली आणि शिरूर दरम्यान 56 किलोमीटरचा दुमजली पुलासह 18 पदरी महामार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची वाहतूककोंडीची समस्या सुटणार असे चित्र दिसत आहे.
पुणे-नगर महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शिरूरचे आमदार अशोक पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, भूसंपादनात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन शिरूर येथे नागपूरच्या धर्तीवर एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सादरीकरण केले होते.
त्यानुसार डीपीआर बनविण्याच्या कामाला सुरवातही झाली होती. परंतु, भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून याठिकाणी दुमजली पुलासह 18 पदरी रस्ता बांधण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.
या महामार्गाच्या कामाचा प्रस्ताव तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला होता. मात्र, त्यानंतरही अपेक्षित गतीने काम पुढे सरकत नसल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती.
अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) निवडीसाठीच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाली असून, पीएमसी निवडीसाठीची निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. लवकरच या महामार्गाच्या कमला सुरवात होईल अशी आशा सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.