कल्पना करा दूर-दूर पर्यंत पाणीच पाणी..मध्यभागी एका आलिशान क्रूझचा संथगतीने प्रवास सुरु आहे, निळ्याशार पाण्याच्या विलोभनीय दृश्यासह 5 स्टार हॉटेलसारख्या सोयी-सुविधा. नदीच्या मधोमध आलिशान रेस्टॉरंट्स, स्पा आणि सनडेकचा अनुभव. ही कोणती विदेशी परीकथा नाही तर लवकरच या सर्व सुविधा तुम्ही भारतात अनुभवू शकता. भारत सरकार जलमार्गांच्या विस्तारासाठी भारतातील क्रूझ पर्यटन उद्योगासह एका नवीन नेत्रदीपक प्रवास सुरु करण्यासाठी सज्ज झालं आहे.

गंगा नदीवरील वाराणसी ते ब्रह्मपुत्रा नदीवरील दिब्रुगडपर्यंत जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या रिव्हर क्रूझचा प्रवास 3200 किलोमीटरचा आहे. या क्रूझची जाहिरात 2018 सालीच करण्यात आली होती आणि प्रस्तावित क्रूझ 2020 मध्ये लॉन्च होणार होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे त्यात विलंब झाला, आणि आता 13 जानेवारीला या नेत्रदीपक प्रवासाला सुरवात होणार आहे.

13 जानेवारी रोजी, 32 परदेशी पाहुण्यांना घेऊन, 3,200Km अंतराच्या 52 दिवसांच्या प्रवासासाठी हे क्रूझ वाराणसीहून निघणार आहे. हे क्रूझ भारत आणि बांगलादेशच्या एकूण 27 रिव्हर सिस्टम्समधून जाणार आहे. यामध्ये गंगा – भागीरथी – हुगली, ब्रह्मपुत्रा आणि पश्चिम किनारी कालव्याचा समावेश आहे. हे क्रूझ पाटणा, कोलकाता, ढाका, धुबरी, गुवाहाटी आणि माजुली बेटावरून जाणार आहे.

रेस्टॉरंट, स्पा आणि सनडेक..

गंगा विलास क्रूझ (Ganga Vilas Cruise) असे त्याचे नाव आहे. हे रिव्हर क्रूझ 22 डिसेंबर रोजी 32 स्विस व्हिजिटर्ससह कोलकाता किनार्‍यावरून निघालं होतं ते 6 जानेवारीला वाराणसीला पोहोचलं आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, गंगा विलासची क्षमता 80 प्रवाशांची आहे. हे एक आलिशान रिव्हर क्रूझ आहे, ज्यामध्ये 18 सूट आणि सर्व आवश्यक सुविधा आहेत. या क्रूझ जहाजावर एक भव्य रेस्टॉरंट, स्पा आणि सनडेक देखील आहे. त्याच्या मेन डेकवरील 40 आसनांच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय पाककृतींसह काही बुफे काउंटर आहेत. अधिकार्‍यांच्या मते, वरच्या डेकच्या बाहेरील आसनामध्ये खऱ्या सागवान स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबलसह बारचा समावेश आहे. प्रवाशांना एक प्रकारचा खास क्रूझ अनुभव देण्यासाठी हे पुरेसं आहे.

18 सुट आणि लक्झरी सुविधा..

जहाजावर 18 सुशोभित सुशोभित सूट आहेत. हे एक विशिष्ट शैली आणि भविष्यवादी दृष्टिकोनासह बांधलं गेलं होतं. गंगाविलासचा आतील भागही खूपच आकर्षक आहे. उत्तर प्रदेश टुरिझम एजन्सीच्या प्रतिनिधींच्या मते, ते अनेक सुविधांनी सुसज्ज आहे. जसे की शॉवरसह स्नानगृह, कन्व्हर्टिबल बेड, फ्रेंच बाल्कनी, एलईडी टीव्ही, सेफ्टी, स्मोक अलार्म, लाईफ वेस्ट आणि स्प्रिंकलर..

किती आहे तिकीट :-

मग क्रूझचे भाडे किती आहे ? अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझ, जे क्रूझ पॅकेज प्रदान करते, या क्रूझच्या तिकिटाची किंमत सार्वजनिक केलेली नाही. परंतु, या अंतरा कंपनीच्या अतुल्य बनारस पॅकेजचे भाडे रु. 1,12,000 पासून सुरू होते. वाराणसी ते कैथी या प्रवासाला चार दिवस लागतात.

काशिफ सिद्दीकी, संचालक (सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंग इंडिया), अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझ यांनी याबाबत लाइव्ह मिंटशी संवाद साधला. या ऐतिहासिक क्रूझच्या तिकिटाची किंमत सार्वजनिक का नाही हे त्यांनी सांगितले. खरं तर, पुढील 5 महिन्यांपर्यंत सर्व तिकिटे स्विस पर्यटकांना विकली गेली आहेत. त्यांनी प्रत्येक सुटसाठी तब्बल 38 लाख रुपये दिले आहेत. या किमती सुमारे दीड वर्ष जुन्या असून येत्या काळात किमती जाहीर होऊन तिकिटाची किंमत सार्वजनिक केली जाईल असं त्यांनी सांगितलं.

गंगा विलास क्रूझ मार्ग

 

जाणून घ्या काय आहे या क्रूझची खासियत..

गंगा विलास क्रूझ एकूण 3200 किलोमीटर अंतर कापणार आहे. रिव्हर क्रूझचा हा जगातील सर्वात लांब प्रवास असणार आहे.

हा प्रवास एकूण 52 दिवसांचा असेल आणि यादरम्यान हे जहाज भारत आणि बांगलादेशच्या 27 नद्यांमधून जाईल.

जागतिक वारसा स्थळांसह 50 हून अधिक ठिकाणी ही क्रूझ थांबेल. हे क्रूझ सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातूनही जाईल.

या क्रुझमध्ये 5 स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. प्रवाशांसाठी रेस्टॉरंट, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, जिम, स्पा, ओपन-एअर ऑब्झर्वेशन डेक, वैयक्तिक बटलर सेवा इत्यादी सर्व लक्झरी सुविधा असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *