कापूस उत्पादकांना शासनाकडून मोठा झटका ! ‘तो’ प्रस्तावही फेटाळल्याने भाववाढीची शक्यता मावळली? पहा आजचे कापूस बाजारभाव..
फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही शेतकऱ्यांचा अर्ध्याहून अधिक कापूस घरातच आहे. जीनिंग व्यावसायिकांच्या मते 25 टक्केच कापूस बाजारात आलेला आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर कमी झाल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाने खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा निर्णय घेतला होता. महासंघाच्या हस्तक्षेपामुळे कापूस बाजारात तेजी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाने हा प्रस्ताव नाकारल्याने कापूस उत्पादकांच्या आशा मावळल्या आहेत.
कोरोना ओसरल्यानंतर जागतिक बाजारपेठ खुली होऊन अचानक कापसाला मागणी वाढली आणि दर किंटलमागे 11 हजारांच्या उच्चांकांपर्यंत पोहोचले होते. यंदाही गतवर्षीची पुनरावृत्ती होईल, या आशेवर शेतकरी असून व्यापारीवर्ग मात्र, जागतिक स्तरावरील कापसाच्या खंडीचे (गाठी) दर पाहता सध्या आहे त्या दरापेक्षाही अधिक घसरण होईल, अशी शक्यता वर्तवित आहेत.
भारतीय कापूस निगमही (CCI) गतवर्षीएवढे उच्चांकांपर्यंत दर वाढण्याची शक्यता नसल्याचेच सांगत आहे. या हंगामात सीसीआयकडून मराठवाडा व खान्देश भागात 37 खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत.
यातील 16 केंद्रांवर आतापर्यंत 28 हजार 500 क्विंटलच खरेदी झाली आहे. मराठवाडा, खान्देशमधील सीसीआयच्या केंद्रांवर 40 लाख गाठी होतील, एवढी कापसाची खरेदी केली जाते. अपेक्षेपेक्षा खूपच कमी आवक कापसाची केंद्रांवर होत असल्याचे सांगण्यात आले आहे. सीसीआय सध्या आठ हजार 100 रुपयांच्या दराने कापूस खरेदी करत आहे.
तर खासगी जीनिंग व्यावसायिक शेतकऱ्यांकडून जागेवर जाऊन 7800 ते 7900 दराने कापूस खरेदी करत आहे. दर गतवर्षीप्रमाणे उच्चांक गाठेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. घरात साठवून ठेवलेल्या कापसाला आता कीड लागली असून त्यातून अंगाला खाज सुटत असल्याने अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत.
भाववाढीचा अंदाज कायम..
आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खेरदीचे दर देशातील दरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे देशातून कापूस निर्यात वाढली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातली कापसाचे भाव तेजीतच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशातील कापूस बाजारालाही आधार मिळेल. कापसाचे भाव पुन्हा सुधारतील. यंदाच्या हंगामात कापसाची सरासरी दरपातळी 8 हजार 500 ते 9 हजार 500 रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज आहे.
– दीपक चव्हाण, शेतिमाल बाजारभाव अभ्यासक
खुल्या बाजारात खरेदी नकोच..
कापूस पणन महासंघाने प्रस्तावित केल्यानुसार महासंघाद्वारे खुल्या बाजारभावाने कापूस खरेदी प्रक्रियेची व तदनुषंगिक व्यवहाराची जबाबदारी शासन घेऊ शकत नाही. त्यामुळे महासंघाने खुल्या बाजारात कापूस खरेदी करू नये, असे सांगत हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे.
जीनिंगकडून 7800 भाव..
आंतरराष्ट्रीय स्तरावरून खरेदी होणाऱ्या गाठींचा दर 55 ते 60 हजार रुपये खंडी (एक खंडी 356 किलोची) आहे. तर आपल्या भागातील कापसाची खंडी ही 60 ते 65 हजार रुपयांच्या घरात पडते आहे. धागेनिर्मिती करणाऱ्यांना आपला कापूस परवडत नाही. मजूर बसून असल्यामुळेच जीनिंग व्यावसायिक सध्या 7 हजार 800 रुपयांनी कापूस खरेदी करत आहेत.
सांडू पाटील , जीनिंग व्यावसायिक
पहा, आजचे कापूस बाजारभाव..
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
22/02/2023 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 4000 | 7900 | 8050 | 7975 |
किनवट | — | क्विंटल | 67 | 7500 | 7700 | 7600 |
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 1750 | 7850 | 7950 | 7900 |
अकोला | लोकल | क्विंटल | 26 | 7900 | 8080 | 7990 |
अकोला (बोरगावमंजू) | लोकल | क्विंटल | 86 | 8000 | 8400 | 8200 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 943 | 7700 | 8010 | 7950 |
वरोरा-माढेली | लोकल | क्विंटल | 1384 | 7275 | 8050 | 7800 |
वरोरा-खांबाडा | लोकल | क्विंटल | 1101 | 7800 | 8070 | 7900 |
काटोल | लोकल | क्विंटल | 95 | 7700 | 7900 | 7800 |
सिंदी | लांब स्टेपल | क्विंटल | 187 | 7650 | 8100 | 7850 |
सिंदी(सेलू) | लांब स्टेपल | क्विंटल | 2500 | 8050 | 8170 | 8100 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 7010 | 7700 | 8230 | 7930 |
वर्धा | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1350 | 7800 | 8150 | 7950 |
भिवापूर | वरलक्ष्मी – मध्यम स्टेपल | क्विंटल | 302 | 7700 | 7950 | 7825 |