सध्याची महाराष्ट्रातील वातावरणाची परिस्थिती पाहता अतिवृष्टी, सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान होत आहे. दिवाळी 8 दिवसांवर येऊन ठेपली असताना परतीच्या पावसाने तर सोयाबीनसह कापसाचे प्रचंड नुकसान केलं आहे. तसेच उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या दरामुळे एकीकडे उत्पादकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले असताना दुसरीकडे टोमॅटोची लाली कांद्यावर भारी पडली आहे. पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोला चालू हंगामातील सर्वाधिक 881 रुपये प्रति कॅरेटचा दर मिळाल्याने उत्पादकांत समाधानाचे वातावरणात आहे.
टोमॅटो आवक घटल्याने दर आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. कांदा टोमॅटो खरेदी विक्रीचे माहेरघर म्हणून पिंपळगाव बाजार समितीची सर्वदूर ओळख आहे.
पिपळगाव बाजार समिती उन्हाळ कांद्याला अवघा 2200-2300 प्रति क्विटल भाव मिळत असल्याने उत्पादकांत संतापाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी निफाडसह दिंडोरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणावर फुलगळ झाल्याने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले.
परिणामी आवक घटल्याने रिपळगाव बाजार समितीत टोमॅटोला वाढीव दर मिळत आहे. काल शुक्रवारी बाजार समितीत 2 लाख 33 हजार 720 टोमॅटो कॅरेट ची आवक झाली. त्यास 20 किलो प्रति कॅरेट्सला वर्षातील सर्वाधिक 881 भाव मिळाला. सरासरी 532 तर कमीत कमी 250 रुपये बाजारभाव मिळाल्याने टोमॅटो उत्पादकांत समाधानाचे वातावरण आहे.
पावसाचा फटका बसल्याने मोठं नुकसान :-
टोमॅटो पिकाला पावसाचा मोठा फटका बसल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी आवकेत घट झाल्याने दर 900 रुपये प्रति कॅरेट्सपर्यंत येऊन ठेपले आहेत. येत्या काही दिवसात पुन्हा पाऊस झाल्यास टोमॅटोचे भाव हजारी पार करतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.