सध्या राज्यभर कांदा, सोयाबीन, कापसाचे दर कोसळत असताना तूर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. राजुत तुरीला चांगला भाव मिळत असून लासूर लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला चांगला भाव मिळत आहे. 8 हजार 500 ते 9 हजार 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत तूर उत्पादक शेतकऱ्यांना पैसे हातात पडत असून पुढील काळता तुरीचा भाव 10 हजारांचाही टप्पा गाठू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
सध्या 150 ते 200 क्विंटल पर्यंत दररोज तुरीची आवक सुरू आहे. तर मक्का, बाजरी, गहू पिकांना खूप अशी काही तेजी – मंदी सुरू नाही. गेल्या खरीप हंगामात कापूस व मकाचे क्षेत्र वाढल्यामुळे तुरीला भाव आल्याचे बोलले जात आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाचे कमी पैसे हातात पडत आहे. कापूस व कांदा या पिकांनी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले.
तर, बाजरी, मक्का व गहू हे पिके काही प्रमाणात शेतकऱ्यांना परवडल्याचे बघायला मिळते. सर्वात जास्त फायदा अद्रक व तूर उत्पादक शेतकऱ्यांना आज रोजी होताना दिसून येत आहे . लासूर स्टेशन परिसरात अद्रक पीक घेणारे शेतकरी मोजकेच आहे त्यांना जवळपास 13 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
तसेच तूर उत्पादक शेतकऱ्यांना देखील तुरीचा मोबदला बाजारपेठेत चांगला मिळत आहे. लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसापासून तुरीला 8500 ते 9000 रुपये प्रति क्विंटल दरापर्यंत व्यापाऱ्यांकडून मिळत आहे. काढणी नंतर लगेचच ज्या शेतकऱ्यांनी तूर विक्री केली त्यांना जवळपास ३ हजार रुपये प्रति क्विंटल दराचा फटका बसला.
मात्र काही दिवस ज्या शेतकऱ्यांनी तूर विक्री करण्याचे थांबवले होते. त्यांना मात्र चांगलाच फायदा झाला आहे. कापूस व मकामुळे तुरीचे क्षेत्र घटले गेल्या वर्षी कापसाला शेवटी 13 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. तर 2000 ते 2100 रुपये प्रति क्विंटल दराने मकाची विक्री झाली होती.
त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कापूस व मकाचीच लागवड केली. परिणामी तुरीचे क्षेत्र घटले होते. त्यामुळे आज रोजी तुरीला चांगलीच तेजी आलेली बघायला मिळते.
यावर्षी तुरीचे क्षेत्र घटल्याने बाजारपेठेत तुरीची आवक कमी झालेली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे आज रोजी तुरीला इतर पिकांच्या तुलनेत सगळ्यात जास्त भाव मिळत आहे. बाजारपेठेत दररोज 150 ते 200 क्विंटल विक्रीसाठी येत आहे. – बंटी शेठ मुथा , अडत व्यापारी