उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडी वाढू लागली आहे. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाळा सुरुवात झाली आहे. हवामान अंदाज स्कायमेटच्या मते, चक्रीवादळाच्या प्रभावाखाली, आग्नेय आणि उत्तर केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीला लागून असलेल्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. ते भारतीय किनारपट्टीपासून दूर पश्चिम-वायव्य दिशेला गेलं आहे.
या हवामान बदलांमुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
आज 5 वाजल्यापासून नाशिक जिल्ह्यात शहरातील नाशिकरोड, सिडको, मखमलाबाद, गंगापूर रोड आदी परिसरात कमी – मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली तर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, गिरणारे, हरसूल, काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झाला असून रब्बी पिकांची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिकसह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस, त्र्यंबकेश्वरला जोरदार हजेरी #Nashik #Nashikrain #Trimbakeshwer pic.twitter.com/yMJvfJVsGd
— PAWAR GOKUL (@TheJournalistDD) December 14, 2022
तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात आज सायंकाळी खामगाव, नांदुरा ,मोताळा तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. यामुळे खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील नदीला हिवाळ्यात पूर आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा जवळा-पांचाळ दिग्रस या गावांच्या शिवारामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
तर पालघर जिल्ह्यातही जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु असून अकोला जिल्ह्यात देखील काही भागात पावसानं हजेरी लावली आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, आजचा अंदाज बरोबर ठरला असून आज 14 डिसेंबरला पाऊस फक्त कोकण आणि विदर्भातच पाऊस झाला आहे. उद्या 15 आणि 16 डिसेंबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रासह औरंगाबाद, अहमदनगर,धुळे, नंदुरबार, नाशिक, मुंबई आणि कोकणासह लगतच्या भागात पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असून हा पाऊस आणखी 3 दिवस पडणार असून 17 डिसेंबरपर्यंत संपणार आहे.