अंधेरी (प.), यारी रोड ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स दरम्यानचा रखडलेला पूल तब्बल 20 वर्षांनंतर मार्गी लागणार आहे. या पुलामुळे 30 ते 45 मिनिटांचा प्रवास आता अवघ्या पाच मिनिटांत होणार आहे. या पुलासाठी पालिकेने निविदा मागवल्या असून 42 कोटींचा खर्च केला जाणार आहे. या पुलासाठी यापूर्वी केवळ 14 कोटींचा खर्च येणार होता. मात्र पूल रखडल्याने या पुलाचा खर्च वाढून आता 26 कोटींवर गेला आहे.
मागील 2002 पासून यारी रोड ते लोखंडवाला या दरम्यानचा पूल पूर्णत्वास नेण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केला जात आहे. पालिकेने 2012 मध्ये या प्रकल्पासाठी निविदाही काढली होती. लोखंडवाला येथील खाडीने यारी रोडपासून वेगळे केले आहे आणि या दोन ठिकाणांमध्ये थेट संपर्क नसल्याने वाहनचालकांना चार आणि सात बंगल्यांतून वळसा घालून जावे लागते.
रहदारी असेल त्यावेळी तब्बल 30 ते 45 मिनिटांचा वेळ लागतो. आता 20 वर्षांच्या कालावधीनंतर निविदा काढण्यात आल्याने हा पूल मार्गी लागणार आहे. या पुलाचे काम झाल्यानंतर 45 मिनिटांचा वेळ लागणारा प्रवास अवघ्या पाच मिनिटांत करता येणार असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकल्पामुळे खारफुटीवर परिणाम होणार असल्याचे सांगत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने हा पूल रखडला होता. या पार्श्वभूमीवर पुलाच्या बांधकाम रचनेत आवश्यक बदल करण्यात आल्याने आता पुलाचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
असा होणार पूल..
या पुलामुळे सध्या होणारी वाहतूक कोंडी फुटेल व वेळ, इंधनही वाचणार आहे.
पूल बांधण्यात येणारी खाडी सुमारे 100 मीटर रुंद आहे आणि पुलाचा प्रस्तावित रोड सुमारे 160 मीटरचा राहणार आहे.
हा पूल खाडीच्या दोन टोकांना जोडणारा असेल.
या प्रकल्पात वाहतुकीसाठी दोन कॉजवे असतील.
कंत्राटदार नियुक्त केल्यानंतर राज्य सरकारकडून पर्यावरण मंजुरीसाठी नव्याने परवानगी मागितली जाईल.