पुणे शहर आणि परिसरातील वाहनांची वाढती संख्या पाहता लवकरच यावर पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तोडगा काढणार आहे. शहरांतर्गत होणाऱ्या वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांसाठी ही एक दिलासादायक बाब असणार आहे.
पीएमआरडीएकडून (PMRDA) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या हद्दीतून जाणाऱ्या 65 मीटर रुंद वर्तुळाकार बाह्यवळण मार्गाचे (पुणे इनर रिंगरोड) काम प्रस्तावित करण्यात आले आहे.
सोलू ते वाघोली हा या मार्गिकेतील पहिला टप्पा असणार आहे. ज्याचे लवकरच प्राधान्यक्रमाने काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते पुणे नगर रस्ता जोडले जाणार आहे. याच्याच परिणामस्वरूप शहरांतर्गत वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणे महापालिका हद्दीपर्यंतचा सोलू ते वडगाव शिंदे हा वर्तुळाकार रस्त्याचा भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विकसित करण्यात येणार आहे. तर, लोहगाव ते वाघोली-वडगाव शिंदे हा 5.70 किलोमीटर वर्तुळाकार रस्त्याचा पुणे महापालिका हद्दीतील भाग पुणे महापालिका विकसित करणार आहे.
त्यामुळे पीएमआरडीए हद्दीतील वर्तुळाकार रस्त्याचा (650 मीटर लांबी) 65 मीटर रुंद भाग आणि प्रादेशिक आराखड्यामधील 650 मीटर लांबीचा 90 मीटर रुंद प्रादेशिक रस्त्याचा भाग हा पीएमआरडीएकडून विकसित करण्यात येणार आहे.
प्रादेशिक आराखड्यातील हा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जुन्या पुणे मुंबई रस्त्याला जोडला जाणार आहे. यासाठी हा मार्ग स्पाईन रस्त्याद्वारे पठारे चौक चऱ्होली हद्द व तेथून निगडी येथून जुन्या मुंबई पुणे मार्गाला जोडला जाईल. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचा ताण कमी होईल.
तसेच हा नवा बायपास हिंजवडीला जाणारा पर्यायी रस्ता म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. वाघोली-लोहगाव-आळंदी-मोशी-निगडी-पुनावळे-हिंजवडी असा हा मार्ग असेल.पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रादेशिक आराखड्यातील रस्त्याचे मोशी पांजरपोळ चौक ते चऱ्होलीपर्यंत एकूण 9.50 कि.मी. चे काम 30 मी. रुंदीने सुरू असून आतापर्यंत जवळपास 80 टक्के काम पूर्ण झालं आहे.
याच धर्तीवर आता पीएमआरडीएच्या अख्यारीत असलेल्या 650 मी. रस्त्याची लांबी 30 मी. रुंदीने वाढवण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम झाल्यास हा 90 मी. रुंदीचा रस्ता पुणे-नगर रस्त्याला जोडला जाणार आहे. परिणामी शहरांतर्गत होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.