विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे अन् या कारणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण अधिक आहे. विदर्भात सिंचनाची व्यवस्था पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक पाण्यावरच शेती करावी लागते. त्यामुळे अनेक वेळा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना शेतीमालाचे उत्पादन कमी मिळते. विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अकोला, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाच्या ऱ्हासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

यावरचं तोडगा काढण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नदीजोड प्रकल्पांतर्गत वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. मात्र, या प्रकल्पाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

यावर संसदेत झालेल्या हिवाळी अधिवेशनात बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत नियम 377 अन्वये प्रश्न उपस्थित करून वैनगंगेतून सुरू असलेल्या नळगंगा प्रकल्पाच्या कामाकडे सभागृहाचे लक्ष वेधलं होतं.

याचे पडसाद राज्यात असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले. याबाबत प्रकल्पाबाबत बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे आमदार श्वेता महाले यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी या प्रोजेक्टबाबत सकारात्मक माहिती दिली.

याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वैनगंगा – नळगंगा नदी जोडो प्रकल्प बाबत आढावा घेण्यात आला असून यासाठी 5 लाख 72 हजार हेक्टर जमीन संपादितही केली आहे.

तसेच यासाठी सुधारित आराखडा तयार केला असून, या नदीजोड प्रकल्पासाठी 426 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासन 82 हजार कोटींचा खर्च करणार आहे. या प्रकल्पासाठी राज्यस्तरीय समितीची मान्यता घेऊन टेंडर काढण्यात येणार आहे.

राज्यातील आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा हा बोगदा असून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशीम या सर्व जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे.

या प्रकल्पामुळे विदर्भातील दुष्काळी भागातील प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पात वाशीम जिल्ह्याचा समावेश केला आहे. हायेस्ट पॉइंटवरून पाणी लिफ्ट करून वाशीम जिल्ह्याचाही पाणी प्रश्न मिटणार आहे.

तसेच हा प्रोजेक्ट पुढे परभणी, हिंगोलीपर्यंत नेण्यासाठी आराखडा केला असून राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता घेऊन नियामकाकडे प्रकल्प सादर केला जाईल अन् त्यानंतर निविदा काढण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *