राज्यातील उन्हाचा पारा घसरला असून, 44 अंशांवर गेलेला पारा दोन पॉईंटने घटून 42 अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. बुधवारी (दि. 8 मे) मालेगाव येथे सर्वाधिक 42.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी हवामानशास्त्र विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
वातावरणाच्या खालच्या थरातील द्रोणिका रेषा ईशान्य राजस्थान ते दक्षिण कर्नाटकपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातून जात आहे. त्यामुळे कोकण – गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्यामध्ये विदर्भातील अमरावती, भंडारा, वाशिम, नागपूर, वर्धा या ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस, तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड भागातही विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल.
त्यामुळे या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
काही प्रमुख शहरांचे कमाल तापमान..
मालेगाव आणि वाशिम (42.6) अकोला (42.5), जळगाव (42.4), सोलापूर (41.6), परभणी (41.3), वर्धा (41), बीड (40.7), नांदेड आणि अमरावती (40.6), यवतमाळ (40.5), बुलढाणा (40.4), छत्रपती संभाजीनगर (40.2), धाराशिव आणि ब्रह्मपुरी (40.1), पुणे (41.8), नाशिक आणि सातारा (39.2), तर चंद्रपूर (३९) अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.