महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा गरजू लोकांना फायदा होणार आहे.
15 ऑगस्टपासून सर्वांसाठी मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशाच्या संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येकाला निरोगी जीवन जगण्याचा अधिकार आहे. याच अंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोफत उपचाराचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला होता, त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
सर्व राज्य शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, शासकीय प्रसूतीगृहे, जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये, नाशिक व अमरावती येथे स्थापन झालेली राज्य शासनाची सुपर स्पेशालिटी रुग्णालये, शासकीय कर्करोग रुग्णालये या योजनेअंतर्गत येतात.
आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या राज्यात सर्व शासकीय रुग्णालयांसह वर्षभरात सुमारे 2 कोटी 55 लाख नागरिक उपचारासाठी येतात. राज्यभरात एकूण 2418 राज्य सरकारी रुग्णालये आहेत..
महापालिका रुग्णालयाचा समावेश नाही..
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी रुग्णालयांच्या OPD मध्ये केसपेपर बनवण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागते, त्यामुळे उपचाराला उशीर होतो. शासनाच्या तिजोरीत दरवर्षी 71 कोटी रुपये जमा होत असले तरी आता प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत कागदोपत्री खर्चापासून ऑपरेशनपर्यंत कोणताही खर्च होणार नाही. तसेच या योजनेतंर्गत सर्व शस्त्रक्रियाही मोफत असणार आहेत. ही योजना राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची असल्याने ती राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्येच लागू असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु महानगरपालिका संचालित रुग्णालयांमध्ये लागू होणार नाही..
वर्षाला 100 ते 150 कोटी रुपये होणार खर्च..
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, आरोग्य विभागाचे वार्षिक बजेट 12 ते 13 हजार कोटींचे आहे. मोफत उपचाराच्या या योजनेवर दरवर्षी 100 ते 150 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत..