इगतपुरी – कसारा दरम्यान अधिक रुंदीचा बोगदा आणि दोन नवे रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याकरिता 8.70VVVकोटींच्या निधीला रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने मंजुरी दिली आहे.
यामुळे भविष्यात मध्य रेल्वेच्या या मार्गावरून देशभरातील शंभरहून अधिक रेल्वेगाड्या विना अडथळा धावू शकणार असून, नाशिक – कल्याण लोकलचा मार्गही यामुळे सुकर होणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.
नाशिकरोड ते मुंबई हा प्रवास जलदगतीने होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून खा. गोडसे यांचे प्रयत्न सुरू आहेत. सद्य : स्थितीत या मार्गावर तीन रेल्वेमार्ग असून, इगतपुरी- कसारादरम्यान घाट परिसर असल्याने सर्वच रेल्वेगाड्यांना बँकर लावण्याची गरज पडते.
मात्र, यासाठी वेळ लागत असल्यामुळे मुंबईहून मध्य रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या उशिराने धावत असतात. या घाट परिसरात अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने नवीन बोगदा आणि चौथा व पाचवा नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी खा. गोडसे यांच्या रेल्वे मंत्रालयाकडे सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
इगतपुरी – कसारा दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा चौथा आणि पाचवा रेल्वेमार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून, आता या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 8.70 कोटींच्या खर्चास रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने मान्यता दिली आहे.
इगतपुरी ते कसारा दरम्यान नवीन बोगदा आणि दोन रेल्वेमार्ग प्रस्तावित असल्याने भविष्यात मुंबईहून देशभरात मध्य रेल्वे मागाहून धावणाऱ्या सुमार शभरहून अधिक रेल्वेगाड्या विना अडथळा धावतील. यामुळे बहुप्रतीक्षित नाशिक – कल्याण लोकल धावण्याचा मार्गही मोकळा होणार आहे . – खा. हेमत गोडसे , नाशिक