IND vs SA : गाबा, ओव्हलनंतर भारताने सेंच्युरियनमध्ये इतिहास रचला ; दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी दारुण पराभव !
शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 113 धावांनी जिंकला. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला 191 धावांत आटोपल्यानंतर 113 धावांनी सामना जिंकला.
यासह भारताने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या किलर बॉलिंगनंतर रविचंद्रन अश्विननेही शेवटी आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली.
305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्याच षटकात 191 धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात 327 आणि दुसऱ्या डावात 174 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात केवळ 197 धावा करता आल्या. भारतासाठी पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या केएल राहुलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं .
दक्षिण आफ्रिका संघासाठी कर्णधार डीन एल्गरने (77) दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा केल्या. तर भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी चांगली गोलंदाजी केली. शमी आणि बुमराहने दुसऱ्या डावात प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले.
भारतापूर्वी सेंच्युरियनच्या मैदानावर फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडलाच आफ्रिकेला हरवता आलं होतं. आफ्रिकेचा संघ 2000 साली येथे शेवटचा सामना हरला होता. त्यानंतर झालेल्या पाच सामन्यांमध्ये आफ्रिकेने तीन जिंकले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता.
भारताने ऑस्ट्रेलियातील गाबा मैदानावर इतिहास रचल्यानंतर आता या संघाने दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनवर विजय मिळवला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने ब्रिस्बेन येथील गाबा येथे ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
ऑस्ट्रेलियाचा या मैदानावर 32 वर्षांनंतर पराभव झाला. तसेच याच वर्षी भारतीय संघाने ओव्हलवर इंग्लंडचा पराभव केला होता. ओव्हलवर इंग्लंडचा संघ 50 वर्षांनंतर पराभूत झाला.