महागाईचा झटका ! कंपन्याही झाल्या महागाईने हैराण ; छोट्या पॉकेटचं वजन घटवलं, 5 रु. चा बिस्किट पुडा होणार बंद !
शेती शिवार टीम, 11 मे 2022 :- आता कंपन्यांनाही महागाईचा फटका बसताना दिसून येत आहे.यामुळेच ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या FMCG कंपन्यांनी छोट्या पॅकेटचे वजन कमी करण्यास सुरुवात केली आहे. पार्ले (Parle) आणि ब्रिटानिया (Britannia) सारख्या कंपन्या ग्रामीण बाजारपेठेवर पकड कायम ठेवण्यासाठी छोट्या पॅकेटमध्ये वस्तू विकण्यावर अधिक भर देतात. लहान पॅकेज केलेल्या वस्तूंचा वाटा त्यांच्या एकूण विक्रीच्या 40 ते 50% आहे.
मात्र, महागडे खाद्यतेल, साखर आणि गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे या कंपन्यांवर 2 रुपयांपासून ते 10 रुपयांपर्यंतच्या छोट्या पॅकेटचे वजन कमी करण्याचा दबाव निर्माण झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत 10 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्रसिद्ध पार्ले-जी (Parle-G) बिस्किटांच्या सर्व पॅकेटचे वजन सात ते आठ टक्क्यांनी कमी झाले आहे.
पारले कंपनीचे वरिष्ठ प्रमुख कृष्णराव बुद्धा सांगितलं की, लहान पॅकेट्सचे उत्पादन हे एक आव्हान आहे, कारण त्यांच्याकडून मिळणारा महसूल फारसा चांगला नाही. शक्यतो आम्ही पॅकेटचे वजन कमी करतो, असे ते म्हणाले. अशा प्रकारे आपण टिकून राहतो आणि महागाईचे व्यवस्थापन करतो. आम्ही थेट 10 रुपयांपेक्षा जास्त पॅकेटची किंमत वाढवतो.
घाऊक किमतीत झाली वेगाने वाढ…
महागाईमुळे केवळ घरांची खर्च करण्याची क्षमता कमी होत नाही तर कंपन्यांनाही याचा फटका बसत आहे. कारण किरकोळ किमतींपेक्षा घाऊक किमती वेगाने वाढत आहेत. उदाहरणार्थ, वार्षिक आधारावर, मार्च तिमाहीत साखरेच्या किमतीत 7 टक्क्यांनी, तर काजूच्या किमतीत 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय पॅकेजिंगचा खर्चही वाढला आहे. मार्च तिमाहीत लॅमिनेशन 20 टक्क्यांनी महाग झाले आहे. कोरुगेटेड बॉक्सच्या किमतीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली झाल्याने हा फटका कंपन्यांना सहन करावा लागला आहे.
कंपन्यांना नाही दुसरा पर्याय…
बुद्धांचं असं म्हणणं आहे की, आपल्याला पर्याय नाही. आम्ही 5 रुपये आणि 10 रुपये किंमतीची पॅकेट्स ग्राहकांना हवी आहेत म्हणून विकत राहू. कंपनीच्या एकूण विक्रीत पारले बिस्किटांच्या पाच रुपयांच्या पॅकेटचा वाटा 40 ते 45 % आहे. त्याचबरोबर 10 रुपयांच्या पाकिटांच्या एकूण विक्रीत 25 ते 30% वाटा आहे.
कंपनी चालवण्यात येत आहे अडचणी…
प्रिया गोल्ड ब्रँड अंतर्गत बिस्किटांची विक्री करणारी सूर्या फूड अँड अँग्रो कंपनीचे म्हणणे आहे की, महागाईमुळे कंपनीचे कामकाज कठीण होत आहे. कंपनीचे संचालक शेखर अग्रवाल सांगतात की, आधी महागाई वाढली की वजन कमी करायचं, पण आता ही पद्धतही काम करत नाही…
आम्ही 5 रुपयांचे पॅकेट बंद करू शकतो किंवा 5 रुपयांच्या पॅकेटची किंमत 10 रुपयांपर्यंत वाढवू शकतो. आता आम्ही पाच रुपयांना कोणत्याही वजनाचे पॅकेट देऊ शकत नाही. सूर्या फूड अँड अँग्रोच्या पोर्टफोलिओमध्ये 5 ते 10 रुपये किंमतीच्या 70% उत्पादनांचा समावेश आहे.
बंद होऊ शकतात 5 रु. चे पॉकेट….
कंपन्यांचं असं म्हणण आहे की, आमच्यावर लवकरच फक्त 10 रुपयांचे पॅकेट विकण्याचा दबाव येऊ शकतो. पारले कंपनीचे बुद्धा सांगतात की, येत्या दोन-तीन वर्षांत पाच रुपयांच्या पाकिटाची किंमत केवळ 10 रुपये होऊ शकते. हळूहळू 5 रुपयांचे पॅकेट ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याने ते बंद केले जाऊ शकते. गेल्या आठवड्यात आर्थिक निकाल जाहीर करताना, ब्रिटानियाने या वर्षी किमतीत 10% वाढ करण्याची गरज असल्याचे सांगितले होते अन् ही वाढही वजन कमी करून केली जाईल.
चीनच्या लॉकडाऊनमुळे वाढलं संकट…
कोरोनाला रोखण्यासाठी चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. याचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होत आहे. चीनमुळे जागतिक पुरवठा साखळी दीर्घकाळ प्रभावित राहिल्यास आगामी काळात महागाईचे संकट आणखी गडद होऊ शकतं, असे तज्ज्ञांचे म्हणणं =आहे. महागाईचा सर्वाधिक परिणाम खाद्यपदार्थांवर होणार आहे.