शेतीशिवार टीम, 7 जून 2022 : HDFC बँकेने या महिन्यात पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. खरं तर, बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स (MCLR) मध्ये 35 बेस पॉईंट्सने प्रचंड वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, नवे दर 7 जून म्हणजे आजपासूनच लागू होतील. या निर्णयामुळे कर्जदारांवर ईएमआयचा (EMI) बोजा वाढणार आहे.
या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट नुसार, MCLR मध्ये 0.35 टक्क्यांच्या वाढीनंतर, एका रात्रीच्या मुदतीच्या कर्जासाठी हा दर 7.15 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय तो एका महिन्यासाठी 7.55% आणि तीन महिन्यांसाठी 7.60% झाला आहे.
सहा महिन्यांच्या मुदतीच्या कर्जावरील MCLR दर आता 7.70 टक्के करण्यात आला आहे, तर एका वर्षासाठी तो 7.85% करण्यात आला आहे. तर SBI आणि PNB बँकेबद्दल बोलायचं झालं तर एका वर्षासाठी MCLR सध्या SBI मध्ये 7.2% आणि PNB मध्ये 7.4% आहे.
बँकेने शेअर केलेल्या माहितीनुसार, या वाढीनंतर, दोन आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR दर अनुक्रमे 7.95% आणि 8.05% झाला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, HDFC बँकेने एका आठवड्यात दुसऱ्यांदा कर्ज महाग केलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जून रोजी बँकेने RPLR (रिटेल प्राइम लेंडिंग रेट) मध्ये 5 बेसिस प्वाइंटची वाढ केली होती.
MCLR मधील वाढ केल्यानं काय होतो परिणाम :-
MCLR मधील वाढ सर्व प्रकारच्या कर्जांवर परिणाम करते आणि बहुतेक कर्जे MCLR शी एक वर्षाच्या कालावधीसह संबंधित आहेत. या वाढीमुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. यासोबतच कर्ज घेणाऱ्या कर्जदारांवर ईएमआयचा (EMI) भारही वाढला आहे.
बहुतांश बँकांमध्ये वाढले आहेत रेट :-
गेल्या आठवड्यात, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक आणि गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ (HDFC) यांनी दर वाढवण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिन्यात, केंद्रीय बँक RBI ने 4 मे रोजी रेपो दरात 40 bps (0.40%) वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून बहुतेक बँकांनी दर वाढवले आहेत. आता या आठवड्यात MPC (मॉनेटरी पॉलिसी कमिटी) ची बैठक होणार आहे आणि रेपो रेट पुन्हा 25-50 bps (0.5-0.50%) ने वाढण्याची शक्यता आहे.