शेतीशिवार टीम,20 डिसेंबर 2021 :- कमकुवत जागतिक संकेत आणि ओमायक्रॉन धास्तीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) सोमवारी (दि.20) सकाळच्या सत्रात सुरुवातीलाच तब्बल 1040 अंकांनी कोसळला. निफ्टी देखील 300 हून अधिक अंकांनी खाली आला.
त्यानंतर सेन्सेक्सची ही घसरण सुरुच होती. शेअर बाजार खुला होताच सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला. सकाळच्या सत्रातील घसरण ही 1.88% एवढी आहे. सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
जर आपण सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोललो तर निफ्टी फार्मा, हेल्थ केअर, ऑइल अँड गॅस, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑटो, मेटल, पीएसयू बँक, रियल्टी, आयटी, मीडिया, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, खाजगी बँक या सर्वांची स्थिती वाईट आहे.
त्याचवेळी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही मोठी घसरण झाली आहे. बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक 3.3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.
पाश्चिमात्य देशांत कोरोनाच्या ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या आणि जागतिक बाजारपेठेतील कमजोरीचे सोमवारी भारतीय शेअर बाजारात पडसाद उमटले. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 15 मिनिटांत तब्बल 5.99 लाख कोटी रुपयांचा फटका बसला.
Sensex plunges 1040 points to trade at 55,971 in the opening session; Nifty at 16,677 pic.twitter.com/AxAI9dKL6R
— ANI (@ANI) December 20, 2021
जागतिक स्तरावरील कमजोरीमुळे परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शेअर्स विक्रीचा सपाटा लावला आहे. काही नकारात्मक घटकांमुळे बाजारात घसरणीची चिंता निर्माण झाली आहे.
तसेच वाढती महागाई, ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या, विकसित अर्थव्यवस्थांमधील वाढीचा वेग मंदावणे आदी कारणांमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचं म्हणणं आहे.