शेतीशिवार टीम, 15 फेब्रुवारी 2022 : सोन्याची क्रेझ प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. यापासून बनवलेले दाग-दागिने लोक छोट्या-मोठ्या फंक्शनमध्ये तर लग्न झालेलया महिला रोज वापरतात. आजही लग्नसोहळ्यात नववधूंना सोन्याचे दागिने चढवले जातात. कालांतराने त्या अलंकारांची रचनाही खूप बदलली आहे. तुम्ही सोनाराकडे गेल्यावर सोनार तुम्हाला कोणते सोने पाहिजे असे विचारतो. 22 कॅरेट कि 24 कॅरेट….
इतके महाग असूनही सोने दोन प्रकारचे का असते याचा कधी विचार केला आहे का ? ते दोन श्रेणींमध्ये का ठेवले जाते ? याचा अर्थ एक सोने चांगले आणि दुसरे वाईट असा तर होत नाही. असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील.पण याचे उत्तर क्वचितच कोणाला माहीत असेल. तर आज या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला यामधील नेमका फरक सांगणार आहोत..
22 कॅरेट आणि 24 कॅरेटमधील फरक समजून घेण्यासाठी,तुम्हाला प्रथम कॅरेट माहित असणं आवश्यक आहे.जाणून घ्या, कॅरेट ही सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. कॅरेटचे मूल्य जितके जास्त तितके सोने शुद्ध असतं. जे 0 ते 24 च्या स्केलवर मोजलं जातं. हे लक्षात घेता 24 कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध सोने आहे. जे तुम्ही खरेदी करता…
तांबे,निकल,चांदी,पॅलेडियम यांसारखे अनेक धातू सोन्याला मजबूत करण्यासाठी आणि दागिने तयार करण्यासाठी जोडले जातात.अशा प्रकारे,असं म्हटलं जाऊ शकतं की, कॅरेट हे सोन्याचे इतर धातू किंवा मिश्र धातुंच्या गुणोत्तराचे देखील एक माप आहे. या धातूंमुळे दागिने मजबूत होतात.
24 कॅरेट सोने :-
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्धता दर्शवते. 24 कॅरेट सोन्याला ‘प्योअर गोल्ड’ असंही म्हटलं जातं. आणि ते सर्वात शुद्ध सोने देखील मानलं जातं. 24 कॅरेटपेक्षा वरती सोन्याचं रूप नाही. जर आपण भारतातील 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोललो, तर त्याची किंमत दररोज चढ-उतार होत असते. पण ते सोन्याचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे. 24 कॅरेट सोनं अति नरम असल्याने त्यापासून दागिने बनवणे खूप कठीण बनतं. म्हणून सराफ बाजारात बहुतांश 22 कॅरेटमध्येच किंवा त्यापेक्षा कमी कॅरेटमधलं सोनं उपलब्ध असतं.
22 कॅरेट सोने :-
या सोन्यात 22 भाग सोने मिसळले जाते. ज्यामध्ये 2 भाग तांबे, जस्त यांसारख्या इतर धातूंमध्ये मिसळले जातात. कारण 24 कॅरेट सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. या कॅरेट सोन्याला ‘916 Gold’ असेही म्हटलं जातं. कारण त्यात 91.67% शुद्ध सोनं असतं.
18 कॅरेट सोने :-
या प्रकारच्या सोन्यामध्ये इतर धातूंचे 18 भाग ते 6 भाग असतात. टक्केवारीत, 18 कॅरेट सोने 75% सोन्यासारखे आहे. आणि इतर 25% मध्ये जस्त, तांबे, निकेल इत्यादी इतर धातू असतात. 18 कॅरेट सोन्यामधील अतिरिक्त धातू 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यापेक्षा कठोर आणि अधिक टिकाऊ असतात.
14 कॅरेट सोने :-
यामध्ये 58.3% सोने आणि 41.7% इतर धातू आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या तुलनेत, 14 कॅरेट अधिक टिकाऊ आणि स्वस्त आहे. 14 कॅरेट सोन्याचे दागिने दैनंदिन वापरासाठी चांगलं मानलं जातं.18 आणि 22 कॅरेट सोन्यापेक्षा हे सोनं जास्त वापरण्यासाठी युज केलं जातं.
कॅरेटनुसार सोन्याची शुद्धता पहा…
24 कॅरेट = 100% शुद्ध सोने (99.9%)
22 कॅरेट = 91.7% सोने
18 कॅरेट = 75.0% सोने
14 कॅरेट = 58.3% सोने
12 कॅरेट = 50.0% सोने
10 कॅरेट = 41.7% सोने
आजचे (15 फेब्रुवारी) सोन्याचे दर :-
आज सोन्याचा दारांत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं असून आज सोन्याने 50000 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सोने 820.0 रुपयांनी वाढून 51,090.0 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर पोहचलं आहे. काल 14 फेब्रुवारी रोजी सोन्याची किंमत 50,270.0 रुपयांवर बंद झाली होती.
आजचे (15 फेब्रुवारी) चांदीचे दर :-
चांदीचा आजचा भाव 1,280.0 रुपयांनी वाढून 65,740.0 र किलो पोहचला आहे. काल 14 फेब्रुवारी बंद किंमत 64,460.0 रुपये प्रति किलो होती…
सोन्याची हॉलमार्किंग संख्या पहा…
24 कॅरेट :- 999,
23 कॅरेट :- 958,
22 कॅरेट :- 916
21 कॅरेट :- 875
18 कॅरेट :- 750