शेतीशिवार टीम, 10 डिसेंबर 2021 : तुमच्या आयुष्यात झोप किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? कधीकधी कामामुळे, थकव्यामुळे किंवा तणावामुळे आपल्याला नीट झोप येत नाही किंवा चांगली झोप घेता येत नाही. पण जर तुमची झोप नीट होत नसेल तर तुमचे आयुष्य 12 % नी कमी होऊ शकतं.
सायन्स जर्नलने (Science Journal) केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की, चांगली झोप किती महत्त्वाची आहे अन् ती घेता येत नसेल तर तुम्हाला कोण – कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागेल, कोणत्या आजारांना सामोरं जावं लागेल ? गाढ झोप न येण्याचं कारण काय आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा…
निद्रानाशाच्या समस्येला इनसोम्निया किंवा निद्रानाश म्हणतात, ज्याचा त्रास सर्व वयोगटातील लोकांना होतो. यामुळे त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
झोप हा तुमच्या शरीरासाठी आराम आणि पुन्हा उत्साही होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. झोपेच्या कमतरतेचा संबंध अनेकदा उच्च रक्तदाब (High blood pressure), लठ्ठपणा (Obesity) आणि मधुमेह (Diabetes) यांसारख्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे रोज किमान सात ते आठ तासांची झोप घेण्यावर भर दिला जातो.
नीट झोप न लागण्याचा काय आहे धोका ?
अभ्यासात असं म्हटलं आहे की, जर तुम्ही 6 तासांपेक्षा कमी झोपलात तर तुमचं आयुष्य 12 % कमी होऊ शकतं. म्हणजेच तुम्हाला अकाली मृत्यूला सामोरं जावं लागू शकतं. झोपेच्या कमतरतेमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते, म्हणजेच लवकर आजारी पडण्याचा धोका वाढतो.
तसेच, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे, कोविड लसीची परिणामकारकता कमी होण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे तुम्ही या नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटशी सामना करण्यास असमर्थ ठरू शकता…
शरीरावर काय होऊ शकतो परिणाम ?
अभ्यासानुसार, निद्रानाशाचा (Insomnia) तुमच्या शरीराच्या तीन भागांवर सर्वाधिक परिणाम होतो. पहिला मेंदू (Brain), दुसरा हृदय (Heart) आणि तिसरा स्वादुपिंड (Pancreas). निद्रानाशामुळे आपला मेंदू सतर्क राहू शकत नाही. यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमताही कमी होऊ शकते. अधिक गंभीर स्थितीत, तुम्ही स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर या सारख्या गंभीर आजाराला बळी पडू शकता…
तसेच, निद्रानाशामुळे उच्च रक्तदाबाचा धोका (High blood pressure) जास्त असतो. या स्थितीत तुम्ही जर दीर्घकाळ राहत असाल तर तुम्हाला कधीही हृदयविकाराचा झटका (Heart attack) किंवा पक्षाघाताचा झटकाही (Paralysis) येऊ शकतो.
कमी झोपेमुळे आपले स्वादुपिंड (Pancreas) नीट काम करू शकत नाही आणि लठ्ठपणा (Obesity) वाढण्याची शक्यता वाढते. यासोबतच शरीरात टाइप-2 मधुमेह (Type-2 diabetes) होण्याचा धोका वाढतो. तुमच्या शरीराची Metabolism म्हणजेच पचनक्रियाही बिघडते.
काय आहे निद्रानाशाचं (Insomnia) नेमकं कारण ?
अभ्यासात असं म्हटलं आहे की, नीट झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात – जसे की ध्वनी प्रदूषण (Sound pollution) , तणाव, अस्वस्थता, अपमान, कंपनीमधील शिप प्रमाणं काम, फसवणूक, सामाजिक – आर्थिक परिस्थिती (socioeconomic condition) किंवा कामाची बदली आणि वेळ… यामुळे, जगातील विविध समुदायांचे लोक वेगवेगळ्या प्रकारे चिंतेत असल्याने असं घडतं…