शेतीशिवार टीम, 5 डिसेंबर 2021 : देशात ओमिक्रॉन व्हेरिएंट अत्यंत वेगाने पसरत असून पुणे आणि पंपरी-चिचवड पाठोपाठ आता राजस्थानमध्येही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं पहायला मिळते आहे. राजस्थानमध्ये नऊ जणांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 9 रुग्णांमध्ये हा नवीन व्हेरिएंट आढळला असून आत्तापर्यंत देशातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 21 झाली आहे. अलीकडेच, दक्षिण आफ्रिकेतील चार संशयित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पाच रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.
जयपूरच्या सवाई मानसिंग मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुधीर भंडारी यांनी नऊ जणांमध्ये कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची पुष्टी केली आहे. त्यांच्या मते या 9 रुग्णांमध्ये कोरोनाचं नवीन रूप दिसलं आहे.
दक्षिण आफ्रिकेतून जयपूरला आलेल्या 4 रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हे चारही रुग्ण कोरोना बाधित होते. अशा परिस्थितीत या रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता इतर 5 रुग्णही त्यांच्या संपर्कात आले, त्यानंतर या 5 रुग्णांनाही संसर्ग झाल्याचे आढळून आले.
अशा परिस्थितीत या 9 रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल आल्यानंतर हे सर्व रुग्ण कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंट ने संक्रमित असल्याची पुष्टी झाली.
सध्या खबरदारी म्हणून या रूग्णांना RUHS हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या 9 रुग्णांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे.