शेतीशिवार टीम, 13 एप्रिल 2022 :- एकीकडं वाढतं ऊन अन् दुसरीकडं दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. वाढत्या उन्हात महागाईचा तडाखाही वाढला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, लोक बाजारात उपलब्ध असलेले स्वयंपाकाचे स्वस्तातलं तेल खरेदी करत आहे.तर मार्चमध्ये महागाईने तर नवा विक्रम नोंदवला आहे.

मार्च महिन्यात भारतातील किरकोळ महागाई 6.95% पर्यंत वाढली, जी गेल्या 17 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे. म्हणजेच महागाईच्या बाबतीत गेल्या 17 महिन्यांचा विक्रम मार्चमध्ये मोडला गेला. मंगळवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे…

फेब्रुवारी महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक किंवा CPI द्वारे मोजलेली महागाई 6.07% होती. किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये 6.01% नोंदवला गेला. तसेच, गेल्या मार्चमध्ये किरकोळ महागाई दर 5.52% होता. अन्नधान्य चलनवाढीचा दर फेब्रुवारीमध्ये 5.85 टक्क्यांवरून मार्चमध्ये 7.68 टक्क्यांवर पोहोचला आहे.हा सलग तिसरा महिना आहे, ज्यामध्ये महागाई दराने (Inflation rate) RBI ची 6% ची वरची मर्यादा ओलांडली आहे.

काय आहे कारण…

रशिया-युक्रेन युद्धामुळे संबंधित पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे जागतिक धान्य उत्पादन, खाद्यतेलाचा पुरवठा आणि खतांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. जगातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या वनस्पती तेल / पाम तेलाच्या किमती या वर्षी जवळपास 50% वाढल्या आहेत. दारिद्र्यरेषेखालील लाखो लोकांना अन्नधान्याच्या या वाढत्या किमतीमुळे उपासमारीची वेळ आली आहे.

फेब्रुवारीमध्ये 1.7% वाढला IIP…

दरम्यान, मंगळवारी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) फेब्रुवारीमध्ये 1.7% वाढला, जो जानेवारीत 1.3% होता. तसेच, डिसेंबर 2021 मध्ये औद्योगिक उत्पादन 0.7 टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये IIP वाढ 0.4 टक्क्यांच्या 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली होती.

मंगळवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, खाण आणि उर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे फेब्रुवारीमध्ये औद्योगिक उत्पादन 1.7 टक्क्यांनी वाढले. मॅनुफॅक्चरिंग सेक्टर ची वाढ 0.8% होती. आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एप्रिल-फेब्रुवारी दरम्यान औद्योगिक वाढ 12.5% होती. तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो 11.1 टक्क्यांनी घसरला होता.

उत्पादन क्षेत्राने 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) विक्रमी 12.9 टक्क्यांनी वाढ नोंदवली, जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत 12.5 टक्क्यांनी घसरली होती.

अमेरिकेत महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर….

अमेरिकेमध्ये ग्राहकांच्या किमती मार्चमध्ये वार्षिक 8.5% वाढल्या, जो डिसेंबर 1981 नंतरचा उच्चांक जो 40 वर्षांतील हा उच्चांक आहे…

लोकं खरेदी करतायेत स्वस्तातलं खाद्यतेल….

LocalCircles ने सोमवारी प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, “खाद्य तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांना स्वस्त आणि कमी दर्जाचे स्वयंपाकाचे तेल खरेदी करावे लागत आहे.”अहवालानुसार, गेल्या 12 महिन्यांत खाद्यतेलाच्या किमतीत 50 ते 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे गेल्या 45 दिवसांत खाद्यतेल 40% महागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *