शेतीशिवार टीम, 23 डिसेंबर 2021 : केंद्र सरकार मुलींचं लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षे करण्याची तयारी करत आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याचा परिणाम सुकन्या समृद्धी योजनेवर (SSY) दिसून येण्याची शक्यता आहे.
या योजनेत सरकार काही बदल करण्याची शक्यता आहे. सध्या ही योजना पालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. परंतु, सुकन्या समृद्धी योजनेतील (SSY) बदलांबाबत तर्क का लावले जात आहेत ते समजून घेऊया…
काय आहे कारण :
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जेव्हा सुकन्या समृद्धी योजना (SSY) सुरू केली तेव्हा तिचा एक प्रमुख उद्देश मुलींच्या विवाहाशी संबंधित होता. या योजनेत अशा अनेक अटी आहेत ज्या मुलीच्या लग्नाच्या वयाच्या आधारावर अर्थात 18 वर्षे निश्चित केल्या होत्या.
सध्या काय आहे परिस्थिती :-
उदाहरणार्थ, सरकारच्या या योजनेत 10 वर्षापर्यंतच्या मुलीसाठी खातं उघडता येतं. मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत हे खातं पालक चालवू शकतात. याशिवाय मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातून काही रक्कम काढता येते. आतापर्यंत मुलींच्या लग्नासाठी 18 वर्षे योग्य असल्याचे सरकारचं मत होतं, मात्र नवीन प्रस्तावानंतर ते 21 वर्षे केलं जाऊ शकतं.
कधी जमा होणार पैसे :-
सध्या, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत (SSY) उघडलेलं खाते उघडण्याच्या तारखेपासून 15 वर्षांसाठी जमा केलं जातं. म्हणजे जर तुमची मुलगी 10 वर्षांची असेल तर तिच्या सुकन्या समृद्धी खात्यात 25 वर्षांची होईपर्यंत पैसे जमा केले जातात. त्यानंतर, मॅच्युरिटी किंवा क्लोजर कालावधी 21 वर्षे आहे. म्हणजे 2021 मध्ये हे खातं उघडलं तर ते 2042 मध्ये बंद होईल. याशिवाय, मुलीच्या वयाच्या 18 वर्षांनंतर (लग्नाच्या 1 महिना आधी किंवा लग्नाच्या तारखेनंतर 3 महिन्यांनंतर) मुलीच्या लग्नाच्या वेळी खाते परिपक्व (mature) होतं. लग्नाच्या वयात बदल झाल्यास हा नियम बदलू शकतो.
योजनेची काय आहे खासियत :
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत (SSY) ,सरकार दरवर्षी 7.6 % व्याज देते. या खात्यात तुम्ही वार्षिक आधारावर रु.250 ते रु.1,50,000 पर्यंत जमा करू शकता.
एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात ठेवींच्या संख्येवर मर्यादा नाही. याचा अर्थ तुम्ही केव्हाही कितीही रक्कम जमा करू शकता. हे खातं जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते.
योजनेमध्ये 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील उपलब्ध आहे. हे खातं तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून उघडू शकता…