शेतीशिवार टीम, 21 मे 2022 :- तुम्हाला ATM मधून पैसे काढायचे आहेत पण तुम्ही कार्ड घरीच विसरला असाल तर आता काळजी करू नका, आता कार्ड नसतानाही तुम्ही ATM मधून पैसे काढू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कार्ड – लेस कॅश काढण्याबाबत नियम जारी केले आहेत. देशातील सर्व बँका आणि ATM मशीनमध्ये ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे.
RBI ने जारी केलं परिपत्रक :-
एका रिपोर्टनुसार, RBI ने 19 मे 2022 रोजी एक परिपत्रक जारी करून सर्व बँकांना ही सुविधा लवकरच सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ही सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे. खरेतर, 8 एप्रिल 2022 रोजी झालेल्या एमपीसीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने या सुविधेची घोषणा केली होती. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हा नवीन नियम आणला जात आहे, सतत वाढणारी ऑनलाइन फसवणूक आणि एटीएममधील कार्ड क्लोनिंगसारख्या घटना लक्षात घेऊन, जेणेकरून सामान्य लोकांचे नुकसान होऊ नये.
जाणून घ्या काय आहे ही सिस्टीम, कशी करणार काम ?
कार्ड-लेस कॅश काढण्याच्या सुविधेअंतर्गत, आता UPI च्या मदतीने डेबिट कार्ड न वापरता कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढता येतील.सध्या काही निवडक बँका आधीच त्यांच्या ग्राहकांना ही कार्डलेस सुविधा देत आहेत. पण, आता RBIचे परिपत्रक जारी केल्यानंतर लवकरच सर्व बँकांना त्यांच्या ATM मध्ये ही सुविधा द्यावी लागणार आहे.
या प्रणालीद्वारे मोबाईल पिन तयार करावा लागेल. कॅशलेस कॅश काढण्याच्या सुविधेत, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे व्यवहार पूर्ण केला जाईल. स्वतःहून पैसे काढल्यावरच ही सुविधा मिळेल. यासोबतच व्यवहाराची मर्यादाही निश्चित केली जाणार आहे.रिपोर्टनुसार अशा व्यवहारांची मर्यादा 5 हजार ते 10 हजार रुपये असणार आहे.
खातेदारांची ओळख प्रमाणित केली जाणार…
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, RBI च्या वतीने या सुविधेची घोषणा करताना, सर्व बँका आणि त्यांच्या संपूर्ण ATM नेटवर्क / ऑपरेटरमध्ये कार्ड-लेस कॅश काढण्याची सुविधा प्रदान करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. या सुविधेद्वारे, जेव्हा एखादी व्यक्ती एटीएममधून पैसे काढते तेव्हा त्या खातेदाराची ओळख युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून प्रमाणित केली जाईल. त्यामुळे फसवणुकीच्या घटना कमी होतील.
फसवणुकीच्या घटनांत सातत्याने वाढ…
ATM मधून पैसे काढणाऱ्या लोकांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मध्यवर्ती बँक RBI च्या म्हणण्यानुसार, कार्डशिवाय पैसे काढल्याने स्किमिंग, कार्ड क्लोनिंग, उपकरणाशी छेडछाड यांसारख्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल. मध्यवर्ती बँक कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा वाढवण्याचे हे मुख्य कारण आहे.